ऑलिंपिक पदकासाठी 'मिशन-2020'

ऑलिंपिक पदकासाठी 'मिशन-2020'
ऑलिंपिक पदकासाठी 'मिशन-2020'

कोल्हापूर - ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्यानंतरही महाराष्ट्राला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळावे, यासाठी राज्याच्या क्रीडा संचालनालयाने "मिशन-2020' असा प्रयोग प्रथमच हाती घेतला आहे. किमान वीस ते बावीस खेळाडूंनी ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे, यासाठी दर्जेदार खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. दोन महिन्यांत खेळाडूंची अंतिम यादी तयार होऊन खेळाडूंना अद्ययावत प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

श्री. जाधव यांनी 1952 ला हेलसिंकीमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये कास्यपदक मिळविले. त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला पदक मिळविता आलेले नाही. गोल्डनबॉय वीरधवल खाडे व आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत यांनी ऑलिंपिकमध्ये धडक मारली होती. पदकाचा नेम साधण्यात दोघेही अपयशी ठरले. पदकांचा वनवास संपविण्यासाठी क्रीडा संचालनालय खडबडून जागे झाले आहे. श्री. जाधव यांनी त्या काळात अद्ययावत सुविधा, प्रशिक्षण नसताना पदकावर आपले नाव कोरले होते. आज खेळाडूंना सोयी-सुविधा पुरवूनही ऑलिंपिकसाठी राज्यातील खेळाडू पात्र ठरत नसल्याचे चित्र आहे. ते बदलण्यासाठी टोकिओ (जपान) येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्याच्या उद्देशाने क्रीडा संचालनालयाने प्रयोग हाती घेतला आहे. त्या अनुषंगाने वीस ते बावीस संघटनांच्या बैठका नुकत्याच पुण्यात विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. बैठकांत संघटनांकडून शिफारशी मागविल्या आहेत. ऑलिंपिकमध्ये ज्या खेळाडूंचा कस लागेल, अशा खेळाडूंची यादी करण्याचे ठरविले. तत्पूर्वी या खेळाडूंसह प्रशिक्षकांच्या मुलाखती होतील. संभाव्य ऑलिंपिक खेळाडू म्हणून या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्याचबरोबर आवश्‍यक प्रशिक्षणासाठी परदेशातही पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर चांगला प्रशिक्षक आयात करून खेळाडूंना डावपेच शिकविले जाणार आहेत. मिशनअंतर्गत शंभरावर खेळाडू मिळाले तरी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तूर्त तरी कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्तीपटू विक्रम कुऱ्हाडे व रेश्‍मा माने यांना संभाव्य ऑलिंपिक खेळाडू म्हणून विचारात घेतले आहे. त्यावर दोन महिन्यांत शिक्कामोर्तब होईल.

निश्‍चित अशी तरतूद नाही
मिशनअंतर्गत निश्‍चित अशी तरतूद करण्यात आलेली नाही. ज्या खेळाडूला आवश्‍यक प्रशिक्षण, सोयी-सुविधा आवश्‍यक असतील त्या उपलब्ध केल्या जातील, असे क्रीडा संचालनालयातील सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com