
सांगली : मिरज शहरानंतर आता कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथे ... जिल्ह्यातील दुसरा मियावाकी प्रकल्प साकारत आहे. नैसर्गिक जंगलाची कृत्रिम छोटी प्रतिकृती असे या प्रकल्पाचे स्वरूप असून, जलबिरादरी आणि नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटीतर्फे सुमारे साडेसहा गुंठ्यांत प्रकल्प होणार आहे. त्यातील वृक्षारोपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल.
अशा प्रकारची वृक्षलागवड ही जपानमधील वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची संकल्पना. त्या त्या परिसरातील स्थानिक वनस्पती प्रजातींचीच लागवड जमिनीचे चार पदर तयार करून केली जाते. त्यासाठी वाढीस लागलेली रोपे निवडली जातात. जंगलात विविध प्रजाती एकत्र नांदतात आणि एकमेकांचा परिपोष करतात. त्यातून जैवविविधता (इकोसिस्टीम) तयार होते. पहिल्या तीन वर्षांच्या देखभालीनंतर त्याची वाढ होऊन साधारण दहा वर्षांनंतर तिथे दाट जंगल तयार होते.
याबाबत पर्यावरणवादी कार्यकर्ते हर्षद दिवेकर म्हणाले, "अकिरा मियावाकी या जपानी वनस्पतीशास्त्रज्ञाने जगभरात वेगवेगळ्या पर्यावरणात हे प्रकल्प यशस्वी केले आहेत. मिरज प्रकल्पातील झाडे आता तीन ते सहा फुटांची झाली आहेत. वाढ समाधानकारक आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सहकार्यामुळे हा मॉडेल प्रकल्प साकारला. आता आम्ही नांगोळे येथे प्रकल्पाचा दुसरा प्रयोग करीत आहोत. त्याला जलबिरादरीचे नरेंद्र चुघ आणि वन विभागाचे सहकार्य लाभत आहे.''
ते म्हणाले, "डोंगर उतारावर होणारा हा कदाचित देशातला दुसराच मियावाकी प्रकल्प असेल. हिमालयाच्या उतारावर आलाप संस्थेने यापूर्वी असा प्रकल्प राबवला आहे. नांगोळेचा प्रकल्प दुष्काळी भागासाठीचा मॉडेल ठरेल. येथे साडेसहा गुंठ्यांत 45 स्थानिक प्रजातींचे 1800 वृक्ष लावले जातील.'' ते म्हणाले, "विशिष्ट संख्येत त्यांची लागवड होईल. जगण्यासाठी जणू त्यांच्यात ही स्पर्धाच लावली जाईल. दहा वर्षांनंतर हे जंगल जगवण्यासाठी नव्याने काहीही करावे लागणार नाही. इथे दोन सारखी झाडे एकमेकांजवळ नसतील. एका टप्प्यावर एकाच प्रजातीची चार-पाच झाडेच टिकतील आणि तीच प्रतिकूल परिस्थितीतही जगू शकतील. एरवीपेक्षा जवळ जवळ रोपे लावल्याने ती दहापट जोमाने वाढतात. जिल्हाभरात आम्ही असे पायलट प्रोजेक्ट जागोजागी करणार आहोत, जेणेकरून हिरवळीचे शाश्वत पॅच नागरी वस्तीत व्हावेत.''
यातून साकारणार जैवविविधता
पिंपळ, आंबा, जांभूळ, शिरीष, महारुख, शिसम, बेहडा, पिंपरणी, नांद्रुक, उंबर, काटेसावर, ऐन, अर्जुन, हिवर, कडुलिंब, रिठा, मोह, शिवण, बाभळ, करंज, पळ, पांगारा, भोकर, बहावा, खैर, बेल, कवठ, शिंदी, कळम, गूळभेंडी, चारोळी, बोर, पारिजातक, मेढशिंगी, करवंद, तरवड, रुई, धायटी, नेपती, आपटा, आवळा, चित्रक, शतावरी, निर्गुडी आदी प्रजातींची निवड या प्रकल्पासाठी केली आहे. या सर्व प्रजाती स्थानिक आहेत.
मिरजेतील प्रकल्पात 57 प्रजाती
जिल्ह्यातील पहिला मियावाकी वृक्षारोपण प्रकल्प मिरजेत झारीबाग येथे आहे. एकूण दहापैकी सहा गुंठ्यांत 57 प्रजातींची साडेपंधराशे रोपे चार महिन्यांपूर्वी लावण्यात आली. आता ती साधारण तीन ते सात फुटांपर्यंत आहेत. त्यांची दोन वर्षे देखभाल करावी लागेल. त्यानंतर पक्षी-मधमाश्या कीटकांसाठी जैवविविधतेने नटलेले असे जंगल नागरी जीवनासाठी गरजेचे असेल.
वृक्षारोपणावर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च टाळून अशा मियावाकी वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले पाहिजे. ते खर्चिक असले तरी शाश्वत आहे. यात झाडांची वाढ नेहमीपेक्षा दहापट अधिक वेगाने होते. हवेतील कार्बन डायऑक्साईड नेहमीच्या वृक्षारोपणापेक्षा तीस टक्के अधिक शोषला जातो. तेथे पडणारा पाऊस शंभर टक्के जमिनीत मुरवला जात असल्याने परिसराची भूजल पातळी वाढते.'
- हर्षद दिवेकर, नेचर कॉन्झर्व्हेशन सोसायटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.