"आमदारकीच्या मोहापायी राजू शेट्टी यांची अवस्था 'पिंजरा' तील मास्तर सारखी"

शिवकुमार पाटील
Thursday, 24 December 2020

नवीन कायद्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार असल्याने आडते, दलालांची बाजू घेणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष शेतकरी हिताच्या कायद्यास विरोध करीत असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला.

किल्लेमच्छिंद्रगड( सांगली) : पिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले. तशीच मोहाची भुमिका विधानपरीषदेच्या आमदारकीसाठी शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी घेतली आहे, असा टोला लगावून अडत दलालांची वकिली करणाऱ्यांना आम्ही जुमानत नाही. हिंमत असेल तर त्यांनी केलेले कायदे बदलून दाखवावेत. असा टोला आमदार आशिष शेलार यांनी माजी खा. राजू शेट्टींचे नाव न घेता मारला.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा व रयत क्रांती संघटना यांनी योजलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करणेत आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सर्वश्री आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, मकरंद देशपांडे, माजी आ. सुरेश हळवणकर प्रमुख उपस्थित होते.

नवीन कायद्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार असल्याने आडते, दलालांची बाजू घेणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष शेतकरी हिताच्या कायद्यास विरोध करीत असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. अदानी, अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या हितास नख लावल्यास आमच्या हातात काठ्या असतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शेलार म्हणाले, "राजश्री शाहू, फुले, आंबेडकर यांना शेतकऱ्यांच्या विकासासाठी अभिप्रेत असलेले कृषीविषयक कायदे करुन शेतकऱ्यांना आर्थिक गुलामगीरीतून बाहेर काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. केंद्राचे कृषीविषयक कायदे हे महात्मा फुले यांच्या शेतकरी हिताच्या चिंतनाशी साधर्म्य साधणारे आहेत. राजर्षि शाहू महाराजांनी बाजारपेठा निर्मितीच्या तत्वाने पूढे नेणारा हा कायदा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजकालीन शेतकरी हिताविरोधी कायद्यास विरोध केला होता.

यशवंतराव चव्हाण यांनाही शेतीचे व्यापारीकरण होवून आडते, दलालांकडून शेतकऱ्यांची होणारी लूबाडणूक मान्य नव्हती अशा परिस्थितीत केवळ आडते, दलाल आणि राजकिय ठगांची मक्तेदारी संपुष्टात येणार असल्याने फुले, आंबेडकर, शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचे पाईक म्हणवून घेणारे काँग्रेस आणि काँग्रेस धार्जिणे पक्ष केंद्राच्या कृषीविषयक कायद्यांना विरोध करीत आहेत."

ते म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरची दुसरी पहाट आहे. मोदींनी 95 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. झोनबंदी ऊठवून शेतकऱ्यांच्या पायाताल बेड्या नष्ट केल्या. झोनबंदी संपून एफआरपी लागू केल्याने ऊस दर मिळू लागला. आता ऊस वजनाच्या पावत्या त्वरीत मिळाव्यात यासाठीही  तातडीने कायदा हवा, तरच काटामारी थांबेल. केंद्राचे कायदे शेतकरीहिताचे आहेत. आडते, दलाल नष्ट होणार आहेत.

व्यापारी, अडतेदार  यांना शेतकऱ्याच्या दारी येवून जादा भाव देऊन माल खरेदी करावा लागणार असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक हित साधले जाणार आहे. किसान निर्भर यात्रा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यास बळकटी देणारी आहे. कायद्यास विरोध करणाऱ्यांची भावना अडते, दलाल यांचे समर्थन करणारी आहे." आमदार पडळकर म्हणाले, "मेंढरांचे नेतृत्व लांडग्यांनी करावे अशा स्वरुपाचे राज्यातले सत्ताधारी पक्षांचे नेते आहेत." आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, "किसान निर्भर यात्रा शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुके आणि तीन शहरात जावून कायद्यास समर्थन मिळवेल.

पहिले महायुद्ध संपल्यानंतर सरकार ठरवेल तोच दर कायदा अंमलात आला. स्वातंत्र्यानंतरही तोच कायदा पूढे लागू राहिला. शेतकऱ्याने पिकविलेले अन्नधान्य रेशनवर आले; परंतु पेट्रोल, डिझेल, ट्रॅक्टर, कापड, औषधे आदी भांडवलदाराच्या वस्तू रेशनवर आल्या नाहीत. केद्राने लागू केलेल्या कायद्यामुळे शेतीत गुंतवणूक होवून शेतमालास चांगला भाव मिळून शेतकरी सुखी होईल. ७० वर्षे काँग्रेसने देशाला लुटले. शेतकऱ्यांचे हित साधणारे नवे कायदे राहूल गांधीना समजणार नाहीत." शरद पवार नेहमी उलटे बोलतात, जे म्हणतात त्याच्या उलटे करतात, असा आरोपही त्यांनी केला. सुरेश हळवणकर म्हणाले, "शेतकऱ्यांचे लुटारुच शेतकरी हिताआड येवून नव्या कायद्यास विरोध करीत आहेत.

" यावेळी भाजप युमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल महाडीक म्हणाले, "पूर्वी गोऱ्यांना हाकलून दिले आणि आता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येणाऱ्यांना हाकलून देण्याची वेळ आली आहे." भाजपचे नेते विक्रम पाटील, सम्राट महाडीक, रोहित पाटील, विकास पाटील, सागर खोत, सतिश महाडीक, कपिल ओसवाल, सभापती जगन्नाथ माळी, नगरसेवक अमित ओसवाल, विकास कुंभार, नानासोा पाटील उपस्थित होती. डॉ. सचिन पाटील, गोरख पाटील, प्रभाकर शेवाळे, शशिकांत बेंद्रे, अरुण पाटील, तानाजी जगदाळे, वासू पाटील, निवास पाटील, चंद्रकांत पाटील, जितेंद्र सातपूते यांनी नियोजन केले.

 अडानी, अंबानी आणि गांजाची शेती
महाविकास आघाडीचे नेते शेती अदानी, अंबानीच्या हाती जाईल असा प्रचार करतात. त्यांना जर गांजाची शेती पिकवायला परवानगी दिली तर ते शेती करायला येतील ना?... अशी मिश्किल टिप्पणी सदाभाऊ खोत यांनी केली.

पिंजरा सिनेमातील मास्तरपिंजरा सिनेमात मास्तरांनी एका मोहापायी शिक्षक असताना हाती तुणतुणे घेतले. तशीच मोहाची भुमिका विधानपरीषदेच्या आमदारकीसाठी शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी घेतली आहे, असा टोला लगावून अडत दलालांची वकिली करणाऱ्यांना आम्ही जुमानत नाही. हिंमत असेल तर त्यांनी केलेले कायदे बदलून दाखवावेत. असा टोला आमदार आशिष शेलार यांनी माजी खा. राजू शेट्टींचे नाव न घेता मारला.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashish Shelar criticized for Leader of Swabhimani Shetkari Sanghatana former MP