"कोरोना'च्या संकटातही आमदार गाडगीळ गायब : पृथ्वीराज पाटील यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

सांगली- महापुराच्या काळात रस्त्यावर न उतरलेले भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ हे "कोरोना' च्या संकटात जास्तीत जास्त "क्वारंटाईन' राहिले आहेत. "ग्रीन झोन' जाहीर झाल्यानंतर ते बाहेर पडून नौटंकी करत आहेत. तसेच राज्यातील महाविकास आघाडीविरोधात टीका करून आंदोलन करत आहेत. राज्यातील सत्ता गेल्यामुळे राजकीय असुयेने त्यांना पछाडले असून पोटशूळ उठल्याची जोरदार टीका कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

ते म्हणाले, ""भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात शुक्रवारी आंदोलन पुकारले आहे. स्थानिक आमदार गाडगीळ यांनी महाविकास आघाडीवर टीका करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची वेळ आता आली आहे. महापुराच्या काळात सत्ताधारी आमदार असताना त्यांनी काय केले. जनतेच्या मदतीसाठी कितीवेळा पाण्यात उतरला. गल्लीबोळातून फिरून मदत केली काय? बोटीतून फिरून केवळ फोटोसेशन केले. आज कोरोनाचे संकट आले असताना लोकप्रतिनिधींनी घरी न बसता रस्त्यावर उतरून काम करावे अशी नागरिकांची अपेक्षा असताना आमदार गाडगीळ जास्तीत जास्त क्वारंटाईनच राहिले आहेत. ग्रीन झोन जाहीर झाल्यानंतर मात्र हॉस्पिटलला भेट देत माहिती घेण्याचे नाटक करत आहेत. जिल्ह्यात रूग्ण सापडल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून मिरजेतील रूग्णालयाला का त्यांनी भेट दिली नाही.'' 

श्री. पाटील पुढे म्हणाले, ""महापालिकेत भाजपची सत्ता असताना त्यांचे नगरसेवक कोरोनाच्या संकटात कोठेच दिसत नाहीत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक रस्त्यावर उतरून काम करत आहेत. राज्यातील सरकारवर टीका करणाऱ्या आमदार गाडगीळ यांना माझा जाहीर सवाल आहे, की त्यांनी महापूर आणि कोरोनामध्ये काय काम केले. जनतेच्या मदतीसाठी ते कोठेच दिसत नाहीत. राज्यातील सत्ता गेल्याचे त्यांना दु:ख झाल्याचे दिसून येते. त्यांनी कोठे अन्नछत्र उघडले नाही की पदरमोड केली नाही. चार गावात मदत केल्याचे केवळ सोपस्कार पार पाडले. आपत्तीच्या काळात महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असताना सत्तेत असूनही भाग घेत नाहीत. स्वत: व्यापारी असताना 54 दिवस व्यापार बंद असूनही तो सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला नाही.'' 

अन्यथा कामाचे वाभाडे काढू- 
महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या आमदार गाडगीळ यांना कामातून चोख उत्तर दिले जाईलच. तरीही यापुढे टीका करताना तोंड सांभाळून बोलावे नाहीतर त्यांच्या कामाचे वाभाडे काढू असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Gadgil disappears even in Corona crisis: Prithviraj Patil