पक्षाच्या आमदाराला पाडणाऱ्यास शिवसेनेने घेतले सोबत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शेतकरी, गोरगरीब, कामगारांसह बेरोजगारांना न्याय देण्याचे काम सेना करू शकते. विकासाच्यादृष्टीने आपण शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. सेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्‍याच्या विकासाचे चक्र गतिमान होऊ शकते. पूरग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याचे काम प्राधान्याने करणार आहे.
- राजेंद्र पाटील-यड्रावकर,
आमदार

जयसिंगपूर - अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेला पाठिंबा दिला. शिरोळ मतदारसंघात आमदार उल्हास पाटील यांचा पराभव केला. सत्ता स्थापनेत शिवसेनेला पाठिंबा देऊन यड्रावकर यांनी एका दगडात दोन पक्षी पाडले असून, भविष्यातील तालुक्‍याचे राजकारण सोयीचे व्हावे, यादृष्टीनेच त्यांनी सेनेला जवळ केल्याचा अंदाज आहे. ऐनवेळी सेनेला पाठिंबा देऊन आमदार यड्रावकरांनी ‘मास्टर स्ट्रोक’ मारला आहे.

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आमदार यड्रावकरांचे नेते आहेत. याबाबत त्यांनी निवडणुकीनंतरही सूतोवाच दिले आहेत. सत्ता स्थापनेतील घडामोडींवर लक्ष देत पाठिंबा देणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले होते. सेना व दोन्ही काँग्रेस मिळून सत्तास्थापन करतील त्या वेळी ते त्यांच्याबरोबर, तर भाजप-सेना सत्ता स्थापन करतील तेव्हा ते युतीबरोबर असतील, असा अंदाज होता. मात्र, त्यांनी थेट सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन पाठिंबा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आमदार उल्हास पाटील यांनी सुमारे चारशे कोटींची विकासकामे मार्गी लावली असतानाही यड्रावकरांनी आमदारकी खेचून आणली. भविष्यातही माजी आमदार उल्हास पाटील हेच यड्रावकरांसमोरील प्रतिस्पर्धी असणार आहेत. त्यामुळे सेनेची भविष्यातील निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यात आमदार यड्रावकरांचा मास्टर स्ट्रोक कामी येण्याची शक्‍यता आहे. आघाडी अथवा युतीला पाठिंबा देतील, असा अंदाज असतानाच त्यांनी पक्षप्रमुख  ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिल्याने तालुक्‍यात हा चर्चेचा विषय बनला आहे. भविष्यातील राजकीय वाटचाल आणि सेनेने सत्ता स्थापन केल्यास यामुळे मिळणारा जादाचा निधी अशा पातळ्यांवर यड्रावकरांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण 
ठरू शकतो.

शेतकरी, गोरगरीब, कामगारांसह बेरोजगारांना न्याय देण्याचे काम सेना करू शकते. विकासाच्यादृष्टीने आपण शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. सेनेच्या माध्यमातून शिरोळ तालुक्‍याच्या विकासाचे चक्र गतिमान होऊ शकते. पूरग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याचे काम प्राधान्याने करणार आहे.
- राजेंद्र पाटील-यड्रावकर,
आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rajendra Patil Yadravkar Support Shiv sena