मोबाईल हॅंडसेटचा हप्ता बुडवण्याचा विचार करताय ... हे वाचाच ! 

Mobile Handset Blocked If You Miss Installment
Mobile Handset Blocked If You Miss Installment

सांगली -  शून्य डाऊन पेमेंट... अर्थात एकही रुपया न भरता हप्त्याने मोबाईल हॅंडसेटची खरेदी करायची आणि पैसे बुडवायचे, असे हजारो प्रकार गेल्या दोन वर्षात देशात घडले आहेत. या बुडव्यांना दणका देण्यासाठी मोबाईल हॅंडसेट कंपन्या आणि अर्थपुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी एकत्रित उपाययोजना आखली आहे. त्यानुसार ग्राहकाचा पैसे बुडवण्याचा उद्देश स्पष्ट झाल्यास तत्काळ हॅंडसेट ब्लॉक केला जाणार आहे.

एका फायनान्स कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर ही कारवाई सुरु केली असून त्यानंतर दणादण हप्ते वसुलीला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सर्वच कंपन्या या उपाययोजनांबाबत गांभिर्याने विचार करत आहेत. 

काय आहे प्रकरण ? 

अत्याधुनिक सुविधा असलेल्या मोबाईल हॅंडसेटच्या किंमती पाचअंकी आहेत. त्यामुळे एकरकमी गुंतवणूक करणे ग्राहकांना शक्‍य होत नाही. परिणामी, ग्राहकांची संख्या रोडावली होती. ती पुन्हा वाढावी, यासाठी हॅंडसेट कंपन्यांनी फायनान्स कंपन्याशी करार करून काही भन्नाट योजना बाजारात आणल्या. त्यात सर्वात प्रभावी आणि चाललेली योजना म्हणजे "शून्य टक्के डाऊन पेमेंट' आणि "शून्य टक्के व्याजदर'. या योजनांनी हॅंडसेट बाजाराला बुस्टर दिला. त्याचवेळी फसवणूकीचे पीकही जोरात उगवले. हॅंडसेट खरेदी करून गायब होणाऱ्यांची संख्या वाढली. वसुली ठप्प झाली. फायनान्स कंपन्यांनी हात आकसता घेतला. नियमावली वाढली आणि पुन्हा त्याचा परिणाम हॅंडसेटच्या उलाढालीवर झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वसुलीसाठी काहीएक कडक धोरण राबवणे आवश्‍यक होते. 

कारवाई स्वरुप असे 

मोबाईल हॅंडसेटसाठी कर्ज पुरवठा करण्यात अग्रेसर असणाऱ्या एका फायनान्स कंपनीने यावर पहिल्यांदा उपाय शोधला आहे. हॅंडसेट निर्मात्या कंपन्यांच्या मदतीने कर्जबुडव्यांचा हॅंडसेट आता ब्लॉक केला जात आहे. त्यामुळे ग्राहकाचा हॅंडसेट कोणत्याही स्थिती काम करणार नाही. तो पूर्णपणे बंद राहील. ग्राहकाने त्याचा हप्ता फायनान्स कंपनीत नेऊन जमा केल्यानंतर हॅंडसेट कंपनीला संदेश दिला जाईल आणि त्यानंतर दोन दिवसांनी हॅंडसेट ब्लॉक काढला जाईल. त्यामुळे बुडव्या ग्राहकांना त्याचा दणका बसणार आहे. 

हेही वाचा - PHOTOS : ३५ फूट उंचीच्या तटावर घर; बांधले कशासाठी ? 

एका दुकानातून खरेदी, दुसरीकडे नेऊन विक्री 

काही फसव्या ग्राहकांनी शून्य टक्के डाऊनपेमेंटवर मोबाईल हॅंडसेट खरेदी केले. ते दुसऱ्या दुकानात नेऊन काही हजार कमी किंमतीला लगेच विकले. त्याला काही गुंतवणूक न करता पैसे वापरायला मिळाले. पुढे तो हॅंडसेट तिसऱ्याच ग्राहकाला विकला गेला. यात फायनान्स कंपनी अडकली, असे प्रकार झाले. या साऱ्याला आता चाप बसणार आहे. हपापाचा माल, गपापाला विकण्याची पद्धतही यामुळे मोडीत निघणार आहे. 

कारवाईमुळे बुडव्या ग्राहकांना दणका
""हॅंडसेट ब्लॉकच्या कारवाईमुळे बुडव्या ग्राहकांना दणका बसला आहे. त्यामुळे हप्ते थकवणे, बुडवणे याचे प्रमाण नगण्य होत आहे. मोबाईल मार्केटसाठी ही महत्वाची बाब आहे.'' 

अजय नानवाणी, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com