कळंबा कारागृहातील आरोपीकडे सापडले मोबाईल, पिस्तूल

कळंबा कारागृहातील आरोपीकडे सापडले मोबाईल, पिस्तूल

कोल्हापूर - संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वाई हत्याकांडातील मुख्य संशयित आणि बनावट डॉ. संतोष पोळचा कळंबा कारागृहातील बरॅकमध्ये पिस्तूल घेऊन बिनधास्त फिरत असल्याचा मोबाईलवर काढलेला व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचबरोबर त्याचे अन्य चार व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्याद्वारे त्याने कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोबाईल व पिस्तूल आणल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे कळंबा कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले असून, प्रशासनाने या व्हिडिओची छाननी सुरू केली आहे. 

दरम्यान, कारागृहाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू आहे. कारागृह पोलिस महानिरीक्षक स्वाती साठे रात्री उशिरा या प्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापुरात दाखल झाल्या. पोळने कारागृह प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला आहे, अशी प्रतिक्रिया अधीक्षक शरद शेळके यांनी दिली आहे. 
शेळके यांनी व्हिडिओ कारागृहातील आहे; मात्र यातील पिस्तूल लाकडी किंवा साबणाचे असावे. त्याने कारागृहात मोबाईल वापरून व तथाकथित पिस्तूल वापरून त्याचा व्हिडिओ व्हायरल करून प्रशासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौकशीअंती गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले आहे.

वाई (सातारा) येथील बेपत्ता वनिता गायकवाड यांचा खून झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी संतोष गुलाब पोळ (वय ५०, रा. वाई, सातारा) याला वाई पोलिसांनी १८ ऑगस्ट २०१६ ला अटक केली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या घटनेनंतर कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी पत्रकारांना सांगितले की, संशयित ज्योती मांढरेला २८ सप्टेंबर, तर पोळला ३० सप्टेंबर २०१६ ला कळंबा कारागृहात हलविले. पोळला सुरक्षिततेच्या कारणास्तव अंडा सेलमध्ये ठेवले होते. तेथे त्याने आठ दिवस उपोषण केले. त्याने वारंवार प्रशासनाविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयाच्या बाजूला असणाऱ्या बरॅकमध्ये ठेवले होते. 

काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओत पोळ कारागृहाच्या बरॅकमध्ये एका कोपऱ्यात चित्रीकरणासाठी मोबाईल ठेवतो. त्यानंतर हातात पिस्तूल घेऊन बरॅकमध्ये बिनधास्त इकडून तिकडे फिरतो. दुसऱ्या व्हिडिओत खाली बसून हातातील पिस्तूल न्याहाळतो. त्याच्या बरॅकमध्ये फायली व कागदपत्रांचा ढीग आहे. अन्य व्हिडिओत त्याने वादग्रस्त विधाने केली आहेत. 

साबणाचे किंवा लाकडाचे पिस्तूल...
व्हिडिओ हा कळंबा कारागृहातील आहे, हे मान्य; पण यात डॉ. पोळने केलेले दावे खोटे आहेत. व्हिडिओत दिसणारे त्याच्याकडील पिस्तूल लाकडी किंवा साबणापासून बनवलेले असण्याची दाट शक्‍यता आहे. कारण अशा पिस्तुलाचा वापर कारागृहात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रजनी गंधा’ कार्यक्रमासाठी केला जातो. मात्र, चित्रीकरणासाठी मोबाईल कारागृहात कसा व कोणाच्या माध्यमातून आला, याचा तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्याला मोबाईल मिळण्याची शक्‍यता कमी आहे. सुनावणीला गेल्यानंतर त्याने नातेवाइकांच्या माध्यमातून गुप्तांगात किंवा तोंडात लपवून मोबाईल कारागृहात आणल्याची व येथून बाहेर नेल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर न्यायालयाच्या सुनावणीवेळी तक्रारीचे विविध अर्ज तो नेत होता. प्रत्येक कागद तपासणे शक्‍य नसल्याने त्या कागदात मोबाईल लपवून त्याने तो आणल्याची शक्‍यता आहे. व्हिडिओ व्हायरल होताच आम्ही त्याच्या बरॅकची तपासणी केली. त्यामध्ये कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे मोबाईल व अन्य वस्तूंची त्याने विल्हेवाट लावल्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपास सुरू असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. 

प्रशासन खडबडून जागे
व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारागृहाच्या सुरक्षेविषयी पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. मोबाईल व पिस्तूल कारागृहात आलेच कसे, याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. कारागृह अधीक्षक शरद शेळके तातडीने कारागृहात दाखल झाले. त्यांनी पोळच्या बरॅकची तपासणी केली. त्यानंतर त्याला वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा अंडा बरॅकमध्ये हलविण्यात आले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाच्या माहितीसाठी प्रसारमाध्यमांशी कारागृह अधीक्षक यांची भेट घेतली असता त्यांनी हे पोळचे दावे फेटाळून लावले. त्याच्यावरील गुन्हे शाबित होण्याच्या भीतीने त्याने पोलिसांना, माफीच्या साक्षीदाराला आणि कारागृह प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हे कृत्य केले असल्याचे सांगितले. 

वाई हत्याकांडाची ३१ वेळा सुनावणी
वाई हत्याकांडाची सुनावणी सातारा न्यायालयात सुरू आहे. आतापर्यंत ३१ वेळा सुनावणी झाली आहे. पैकी २६ एप्रिल, १७ ऑक्‍टोबर, ३१ ऑक्‍टोबर व २३ नोव्हेंबरला त्याला तेथील न्यायालयात नेण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले.

गांजानंतरचा धक्कादायक प्रकार 
कळंबा कारागृहात दोन वर्षांपूर्वी गांजा पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतरही मोबाईल व गांजा कारागृहात नेण्याचा प्रयत्न झाला; मात्र सुरक्षारक्षकांमुळे हा प्रयत्न फसला होता. याप्रकरणी यापूर्वी कर्मचारी संदीप चौधरीला निलंबित केले असल्याचे अधीक्षक शेळकेंनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com