शिराळा पश्‍चिम भागात मोबाइल रेंज गायब; ग्राहकांना मनस्ताप

बाजीराव घोडे
Friday, 9 October 2020

आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात, वाडी वस्तीवर विकसित तंत्रज्ञान पोचले नसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील वाड्या-वस्त्यांवर दिसून येत आहे.

कोकरुड : आजही ग्रामीण भागासह खेड्या पाड्यात, वाडी वस्तीवर विकसित तंत्रज्ञान पोचले नसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शिराळा तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील वाड्या-वस्त्यांवर दिसून येत आहे. केंद्र शासनाने अनेक योजना ऑनलाइन केल्या आहेत. मात्र, मोबाइल कंपन्यांचे "4 जी' पॅक घेऊनही नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाहिजे त्या प्रमाणात या भागात रेंज मिळत नसल्याने मोबाइल क्रमांक चक्क नॉट रिचेबल असल्याचे संदेश फोन करणाऱ्यांना मिळतात. त्यामुळे या भागात इंटरनेट सेवाही विस्कळीत होत आहे. 

केंद्र शासनाने सर्वसामान्यांसह सर्वांचेच काम कमी वेळेत व्हावे, या हेतूने ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत. यासाठी नागरिकांनी देखील विविध मोबाइल कंपन्यांचे "4 जी' पॅक घेतले. परंतु, ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेटवर्कच उपलब्ध होत नसल्याने मोबाइल कंपन्यांकडून घेतलेल्या पॅकचे पैसे वाया जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. मोबाइलला योग्य रेंज उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना ऑफलाइन सुविधा घेण्याची वेळ येते. 

"4 जी' च्या नावाखाली अनेक वेळा "2 जी' व "3 जी' रेंज मिळत मिळत असून डिजिटल इंडियाचा पुरता बोऱ्या वाजला आहे. या भागात अनेक कंपन्यांनी स्थानिक कर अथवा शासकीय महसूल बुडवण्यासाठी एकाच टॉवरवर चार-चार कंपन्यांचा घरोबा मांडला आहे. त्यामुळे नेटवर्क सेवेचा पुरता गोंधळ उडाला आहे. 

नोकरदारांसाठी ऑनलाईन वर्क फ्रॉम होम तर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु, कोकरुड येथे जीओचा टॉवर असून देखील दीड-दोन किलो मीटरवर जिओच्या ग्राहकांना नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहक, विद्यार्थी व पालक यांच्यात तीव्र नाराजी आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. 
- चंद्रकांत पाटील, ग्राहक, तुरुकवाडी

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile range disappears in Shirala West; Annoying customers