"मॉडेल स्कूल' उपक्रम चळवळ ठरेल : प्राजक्ता कोरे

अजित झळके
Saturday, 13 February 2021

राज्य शासनाच्या विविध योजनांना थेट शिक्षणाशी जोडून हा विकास साधण्याची संकल्पना यातून राबवली जाणार आहे. त्याबाबत सांगली  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी "सकाळ'शी साधलेला संवाद. 

सांगली जिल्हा परिषदेच्या शाळांची भौतिक आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्ह्यात मॉडेल स्कूल उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांना थेट शिक्षणाशी जोडून हा विकास साधण्याची संकल्पना यातून राबवली जाणार आहे. त्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्राजक्ता कोरे यांनी "सकाळ'शी साधलेला संवाद. 

प्रश्‍न : "मॉडेल स्कूल' संकल्पना कशी सुचली? 
प्राजक्ता कोरे : ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढे आणली. त्याला मी, शिक्षण सभापती आशाताई पाटील यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. एक चांगला उपक्रम यानिमित्ताने पुढे आला आहे. तो आम्ही नक्कीच यशस्वी करून दाखवू. 

प्रश्‍न : नेमकी काय आहे संकल्पना? 
प्राजक्ता कोरे : जिल्हा परिषदेच्या शाळांचा भौतिक आणि शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याची कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीने सुरवात करणे गरजेचे होते. ती नवी सुरवात म्हणजे ही मॉडेल स्कूल होय. त्यातून शाळा इमारत बांधकाम, इमारत दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, स्वच्छतागृह, उत्तम मैदान, ग्रंथालय हे सारे उभे करायचे आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचा निधी त्यासाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. या साऱ्यानंतर शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षकांची असेल. त्यावर जिल्हा पातळीवरून विशेष लक्ष दिले जाईल. काही चुकत असेल, कमी पडत असेल तर आमचा हस्तक्षेप वाढेल. ही एक चळवळ म्हणून पुढे न्यायची आहे. 

प्रश्‍न : किती शाळांची निवड केली आहे?
प्राजक्ता कोरे : जिल्ह्यात 141 शाळांची पहिल्या टप्प्यात निवड केली आहे. त्यात प्रत्येक केंद्रातील एक शाळा आहेच, शिवाय काही मोठ्या शाळांचा समावेश केला आहे. हा पहिला टप्पा आहे. या उपक्रमात प्रत्येक शाळा सहभागी होईल, असेच नियोजन आहे. 

प्रश्‍न : त्याची सुरवात कधी होणार आहे?
प्राजक्ता कोरे : खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, संबंधित शाळांचे मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. 15) सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात उपक्रमाचे उद्‌घाटन होईल. तेथे ही संकल्पना विस्तृतपणे मांडली जाईल. 

प्रश्‍न : लोकांकडून काय अपेक्षा आहेत?
प्राजक्ता कोरे : हा उपक्रम शिक्षण विकासाची चळवळ बनवायचा आहे. त्यात लोकसहभाग हवाच आहे. पालकांनी विशेष सहकार्य करावे. शाळाच्या गुणवत्ता वाढीसाठी योगदान द्यावे. नव्या संकल्पना राबवण्यास पुढाकार घ्यावा. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The "Model School" initiative will be a movement: Prajakta Kore