प्राथमिक शाळांचे आधुनिकीकरण; 136 मॉडेल शाळा बनवणार 

अजित झळके 
Saturday, 24 October 2020

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण प्रवाही करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार आहे. प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे 136 मॉडेल शाळा निर्माण करण्याचा ठराव आज शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. सभापती आशा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. 

सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण प्रवाही करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार आहे. प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे 136 मॉडेल शाळा निर्माण करण्याचा ठराव आज शिक्षण समितीच्या सभेत घेण्यात आला. सभापती आशा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. 

पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेली शाळा प्राधान्याने निवडली जाईल. त्यात पटसंख्या अधिक असावी, असा प्राथमिक निकष लावण्यात येणार आहे. ही योजना अधिक गांभिर्याने राबवावी, प्रत्येक घटकाने त्यासाठी आपल्या कल्पना मांडाव्यात, असे आवाहनही करण्यात आले. शाळेला क्रीडांगणासाठी जागा असावी, तेथे भौतिक सुविधा, आवश्‍यक शिक्षक इत्यादी बाबी प्राधान्याने द्याव्यात, असे नियोजन असेल. ऍड. शांता कनुंजे, सुरेंद्र वाळवेकर आणि शरद लाड यांनी अशा शाळा निवडाव्यात, असे ठरले. जिल्हा परिषद शाळेतील जनरल रजिस्टर नमूना एकमधील किमान 60 वर्षांपूर्वीपासूनचे शाळा सोडल्याचे दाखले स्कॅनींग करुन घेण्याचे नियोजन केले. 

जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी ज्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, त्यांचे फक्त प्रस्ताव पाहून पुरस्कार दिला जाऊ नये. त्या शिक्षकांच्या शाळेत जावून समक्ष शाळा व विदयार्थ्यांच्या गुणवत्तेचे मुल्यांकन करुन पुरस्कार द्यावा, असे आशा पाटील यांनी स्पष्ट केले. शाळा सूरु करण्याबाबत शिक्षक संघटना सकारात्मक असून आता पट वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. जलजीवन मिशन अंतर्गत शाळांना शाश्‍वत पाणी पुरवठा देणेबाबत सूचना दिली. 

शाळेत हात धुण्याची सोय, स्वच्छतागृह दुरुस्ती, शुद्ध पाणी, क्रीडांगण विकास, सुरक्षा कुंपन भित यासाठी ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव देण्याची सूचना करण्यात आली. टाळाटाळ केल्यास मुख्याध्यापकांवर कारवाईचा इशारा दिला. वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2020-21 साठी खेळाडू, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यासाठी अर्ज मागणी करण्यात आली आहे. अर्ज 5 नोव्हेंबरपर्यंत देता येतील. 
सदस्य ऍड. शांता कनुजे, सुरेंद्र वाळवेकर, शरद लाड, संध्या पाटील, बाबासो लाड, विनायक शिंदे उपस्थित होते.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modernization of primary schools; 136 model schools to be built