नगरसेवक संजय तेलनाडेसह १२ जणांना मोका

भुषण पाटील
सोमवार, 20 मे 2019

एक नजर

  • खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव. 
  • यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश
  • विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल. 
  • नगरसेवक तेलनाडेसह १२ जणांच्या मोका प्रस्तावाला श्री. वारके यांची मंजूरी. 

कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक तेलनाडेसह १२ जणांच्या मोका प्रस्तावाला श्री. वारके यांनी मंजूरी दिली.  

मोका लावण्यात आलेल्या व्यक्तींची नावे अशी - 

संजय तेलनाडे, सुनील तेलनाडे, अॅड पवन उपाध्ये, ऋषीकेश शिंदे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, आरिफ कलावंत, अभिजित जमादार, संदेश कापसे

काही दिवसांपूर्वी कळंबा येथे केलेल्या मटक्‍यावरील कारवाईत इचलकरंजीतील एसटी गॅंगचा मोरक्‍या संजय तेलनाडे व मटकाकिंग राकेश अग्रवाल यांची नावे समोर आली होती. याप्रकरणी त्यांचे साथीदार जावेद दानवाडे, नूर सय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. इचलकरंजीसह जयसिंगपूर, शिरोळ, कर्नाटकात तेलनाडे याचा मटका व्यवसाय जोरात सुरू आहे. 

कळंबा येथील या कारवाईनंतर तेलनाडे पसार आहे. तेलनाडेसह १८ जणांच्या टोळीवर मटका, हाणामारी, दहशत, खंडणी, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेलनाडे हा मटकाचालक सलीम हिप्परगी खून प्रकरणात संशयित होता. या खटल्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यानंतर भरत त्यागी खूनप्रकरणी त्याला अटक झाली. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. कळंबा येथील मटका कारवाईनंतर पोलिसांनी तेलनाडे पसार असतानाच शहापूर पोलिस ठाण्यात त्याच्यासह भाऊ सुनील तेलनाडे, वकील पवनकुमार उपाध्ये, हृषिकेश लोंढे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, अरीफ कलावंत, अभिजित जामदार, संदेश कापसे, दिगंबर शिंदे यांच्यासह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

एसटी गॅंगची वाढणारी दहशत लक्षात घेता पोलिसांनी ठोस कारवाईला सुरवात केली आहे. त्याच्यासह साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने एसटी गॅंगवर मोकाचा प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यानुसार  गुन्ह्यांचा अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर झाला होता. या अहवालानुसार त्यांनी संजय तेलनाडेसह १८ जणांवर मोकाचा प्रस्ताव तयार केल्याचे 
समजते. 

मटका बुकींची बैठक?
कळंबा येथील मटका अड्ड्यावर कारवाई झाल्यापासून तेलनाडे पसार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. या पार्श्वभूमीवर तेलनाडे याचे बुकीमालक धास्तावले आहेत. यातील काही बुकींची बैठक अज्ञात ठिकाणी झाल्याचे समजते. या बैठकीत तेलनाडे याने मोबाईलवर संपर्क करून बुकींना काही सूचनाही दिल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moka to corp orator Sanjay Telnade