
मिरज ः खासगी सावकारी म्हणजे एक काळं साम्राज्य. गुंडशाही, झुंडशाही, लुबाडणूक, मारहाण, चारित्र्यहनन, शारीरिक आणि मानसिक पिळवणूक या साऱ्या प्रकारांचा इथे वापर केला जातो. माणसाला जगणं नको वाटायला लागतं. नरकाच्या यातना सहन कराव्या लागतात. त्यातून जो मानसिक कणखर असतो तो टिकतो, इतरांची जी वासलात होते, त्याची शेकडो उदाहरणं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पहायला मिळतील. या छळाच्या पद्धती अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.
मिरजेतील एका सावकाराने मार खायला एक "डमी' ठेवलाय. वसुलीसाठी कर्जदाराला ओढून आणायचे आणि त्या डमीला त्याच्यासमोर ठोक ठोक ठोकायचे, असा कार्यक्रम सुरू असतो. ही दहशतीची एक पद्धत झाली. अनेकदा मूळ कर्जदाराला त्या पद्धतीने मारहाण झाल्याचा अनेक घटना आहेत. गेल्या आठवड्यात अपर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्याकडे शिराळ्यातील एक कुटुंब आलं होतं. त्या कुटुंबावर सावकाराने हल्ला चढवला होता. इतकी मारहाण झाल्यानंतर आम्ही साऱ्यांनी आत्महत्या करावी का, असा सवाल घेऊन ते आले होते. तेथील स्थानिक पोलिस दाद घेत नाहीत, ही त्यांची कैफियत होती.
सावकाराच्या हाती लागलेला कर्जदार म्हणजे बकराच असतो. एक-दोन हप्ते वेळेत आले तर हा बकरा हलाल होणार नाही, याची कुणकुण लागत असावी बहुदा. हा बकरा कापलाच पाहिजे, हे धोरण. एखाद्या आठवड्याचा हप्ता चुकला की खासगी सावकारांनी पोसलेले गुंड कर्जदाराच्या घरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी जातात. कुटुंबीयांसमोर शिवीगाळ करतात. मुस्कटात मारतात. जीवे मारण्याच्या धमकी देतात. त्यानंतर कर्जदारास खासगी सावकाराच्या अड्डयावर नेले जाते. तेथेही पगारी गुंड आणि मार खाण्यासाठी ठेवलेली पगारी व्यक्ती असा माहोल असतो. पाच-सहा कर्जदारांना पकडून आणल्यानंतर त्यांच्यासमोर या केवळ मार खाण्यासाठी पगारी नेमलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केली जाते. ज्यामुळे इतर कर्जदारांना सावकाराबद्दल भीती वाटते.
व्याजाचे हिशेब दिवसागणिक केवळ याच दबावतंत्राने फुगत जातात. त्याला कुठल्याही गणित शास्त्राचा आधार नसतो. त्यामुळे मी मुद्दलाएवढे व्याजही फेडले आहे, तरी पैसे फिटत कसे नाहीत, असे सांगणारे कैक लोक पोलिसांत येतात. अनेक प्रकरणात खासगी सावकारांनी कर्जदारास त्याच्या कुटुंबीयांना समोरच किंबहुना घरातून बाहेर काढून शेजारपाजाऱ्यांसमोर बेदम मारहाण केली आहे. व्याजापोटी कर्जाच्या कमीत कमी दहापट रक्कम वसूल झाल्यानंतर या कर्जदाराची पुन्हा पुढील सावकाराकडे पाठवणी केली जाते.
मिरज शहरातही अशा प्रकारच्या अनेक गंभीर घटना आहेत. सावकारीतून मिळवलेल्या पैशातून श्रीमंत झालेल्या राजकीय पक्षाच्या एका वजनदार नेत्याबाबत उघडपणे चर्चा होते. काही खासगी सावकारांची मोठी साखळी सध्या मिरज शहरात सक्रिय आहे.
या सगळ्या खासगी सावकारी यंत्रणेचे शहरात मुठभर सूत्रधार आहेत. त्यांना शासकीय यंत्रणा आणि गल्ली बोळातील भुक्कड राजकीय कार्यकर्त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मिरज शहरातील मुख्य चौकात हजारो जणांवर अत्याचार करीत श्रीमंत झालेल्या खासगी सावकारांची छबी त्यांच्या वाढदिवसाला आणि गणेशोत्सवातील स्वागत कमानीवर दिमाखाने झळकत असते. मिरजमध्ये सध्या अशाच तीन खासगी सावकारांची सध्या जोरदार चर्चा आहे. ब्राह्मणपुरीतील एका तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांसह राजकारणात सक्रिय असलेल्या दोघा भावांचा यामध्ये समावेश आहे. अलीकडे आपल्या खासगी सावकारीस कायदेशीर आधार देण्यासाठी त्यांनी चक्क आर्थिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत. हे सगळे छळवणूक आणि लुबाडणुकीचे प्रकार समाज उघड्या डोळ्याने पाहत असतो. त्याबाबत अवाक्षरही काढण्याची हिंमत कोणी दाखवत नाही हे या व्यवस्थेचे
सामाजिक संघटनांचे मौन
मिरज शहरातील अनेक किरकोळ समस्यांबाबत सोशल मीडियासह किसान चौकात वारेमाप चर्चा करणाऱ्या ढीगभर सामाजिक संघटनांनीही खासगी सावकारीसारख्या गंभीर सामाजिक विषयाला अद्याप हात घातलेला नाही. खासगी सावकारीबाबतचे सामाजिक संघटनांचे सोयीस्कर मौन बरेच काही सांगून जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.