शेअर मार्केटच्या भुलभुलैयात कोट्यवधींचा गंडा

वार्षिक ४८ टक्के व्याजाचे आमिष : एजंटांकडून पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल
money lost in stock market fraud crime police sangli
money lost in stock market fraud crime police sangliSakal

बहे : शेअर मार्केटमध्ये वार्षिक ४८ टक्के व्याजाचे आमिष दाखवून जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांना काही एजंटांनी कोट्यवधी रुपयांना फसविल्याचा प्रकार समोर येत आहे. सुमारे एक हजार कोटींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील अनेक बडे व्यावसायिक, राजकीय पदाधिकाऱ्यांसमवेतच छोटे दुकानदार, शेतकरी आदींनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. एजंटांकडून पैसे परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.

‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ हे सार्थ ठरवत शेअर मार्केटमध्ये ‘पैसे गुंतवा आणि मासिक ४ टक्के व्याज मिळवा,’ असे गोंडस आमिष दाखवून जिल्ह्यातील काही एजंटांनी शेकडो गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पडले आहे. या योजनेला भुलून जिल्ह्यातील अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. सुरवातीला या एजंटांनी संबंधित गुंतवणूकदारांना नियमित व्याज परतावाही दिला. आता मात्र अनेकांना गेल्या दोन महिन्यांपासून व्याज मिळणे बंद झाले आहे.

व्याज मिळणे बंद झाल्याने संबंधित एजंटांकडून आधी मूळ रक्कम परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही एजंटांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली आहेत, काही वेळ मारून नेताना दिसत आहेत; तर काही जणांनी पलायन केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. जादा व्याजाला भुलून काही बडे व्यावसायिक, राजकीय पदाधिकाऱ्यांसमवेतच छोटे दुकानदार, शेतकरी आदींनी मोठ्या प्रमाणात यामध्ये गुंतवणूक केली आहे. सुरवातीला काही गुंतवणूकदारांना सहा महिने-वर्षभर मासिक ४ टक्के व्याज मिळालेही. नेमके याचेच ‘मार्केटिंग’ झाल्याने गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीसाठी अक्षरशः उड्या पडल्या. सामान्य लोकांनी भांडवल नसतानाही कर्जे काढून, दागदागिने गहाण ठेवून, जमिनीवर कर्जे काढून, बँक-पतसंस्थांतील ठेवी मोडून यामध्ये पैसे गुंतविल्याचीही चर्चा आहे. एजंटांनी पैसे गुंतवताना काहींना ‘नोटरी’ करून दिल्या आहेत, तर काहींनी ‘नोटरी’ न करताच लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत अशा प्रकारच्या बऱ्‍याच एजंट, कंपन्यांनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. ‘मार्केट ट्रेंड’कडे दुर्लक्ष झाल्याने ही फसगत झाली आहे. व्याजाला सोकावलेले व मोहावर ताबा ठेवू न शकल्याने ‘व्याजाला सोकावला व मुदलाला मुकला’ याचा प्रत्यय येऊ नये, यासाठी अनेक गुंतवणूकदार देव पाण्यात घालून बसले आहेत.

बँका-पतसंस्थांमध्ये कोठेही पैसे गुंतविले तरी वार्षिक ४८ टक्के व्याज मिळत नाही. वर्षाला ४८ टक्के व्याजाच्या जाहिरातीला भुलून लोक पैसे गुंतवणूक करत आहेत. ज्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांनी स्वतः ती करावी. आतापर्यंत काही तक्रारी आल्या आहेत. एजंटांकडून पैसे मिळत नसलेले लोक भेटत आहेत. मात्र, लेखी तक्रारी दाखल करत नाहीत. फसवणूक झालेल्यांनी पुढे येऊन तक्रारी दाखल केल्या पाहिजेत.

- नारायण देशमुख, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com