पाचशेहून अधिकजणांची आता "सेकंड इनिंग' :"कोरोना' मुळे साधेपणाने निरोप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सांगली- जन्मतारीखच माहित नसल्यामुळे (अपवाद वगळता) शाळेत शिक्षकांनी तारीख नोंदवलेले 500 हून अधिक शासकीय व निमशासकीय अधिकारी आज निवृत्त झाले. "कोरोना' मुळे अनेकांचा निरोप समारंभ साधेपणाने झाला. तब्बल 30 ते 36 वर्षे सेवा बजावणारे सन्मानपूर्वक निवृत्त होत असून त्यांची "सेकंड इनिंग' सुरू झाली आहे. 

सांगली- जन्मतारीखच माहित नसल्यामुळे (अपवाद वगळता) शाळेत शिक्षकांनी तारीख नोंदवलेले 500 हून अधिक शासकीय व निमशासकीय अधिकारी आज निवृत्त झाले. "कोरोना' मुळे अनेकांचा निरोप समारंभ साधेपणाने झाला. तब्बल 30 ते 36 वर्षे सेवा बजावणारे सन्मानपूर्वक निवृत्त होत असून त्यांची "सेकंड इनिंग' सुरू झाली आहे. 

साधारणपणे 1975 पूर्वीचा काळ पाहिला तर जन्मतारखेची नोंद करण्याबाबत निरक्षरताच होती. शहरी भागात जन्मलेल्यांची जन्मतारीख नोंद व्हायची. तर ग्रामीण भागात जन्मतारीख माहित नसलेल्यांना शाळेत दाखल करताना शिक्षकच एक जून अशी तारीख नोंदवायचे. त्यामुळे एक जून जन्मतारीख म्हटले की शिक्षकांनी नोंदवलेली तारीख असे समीकरणच बनले होते. अंदाजाचे जन्मतारीख नोंदवताना जन्मवर्ष देखील पुढे-मागे व्हायचे. आज ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेकांची जन्मतारीख एक जूनच असल्याचे निदर्शनास येते. 

साधारणपणे 15 ते 20 वर्षापासून शासकीय सेवेतून 31 मे रोजी निवृत्त होणाऱ्यांची संख्या काही हजारात होती. त्यामुळे 31 मे तारीख म्हटले की अनेक शासकीय कार्यालयाच्या नोटीस फलकावर भलीमोठी यादी लागून धडाक्‍यात निरोप समारंभ व्हायचा. काही कार्यालयात तर मोठे अधिकारी बोलवून निवृत्तांना निरोप दिला जायचा. गेल्या काही वर्षात या तारखेला निवृत्त होणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयातून काही हजारांच्या संख्येने निवृत्त होणाऱ्यांची संख्या आता शेकड्यामध्ये आली आहे. 

यंदा महसूल, पाटबंधारे, जिल्हा बॅंक, पोलिस, वीज कंपनी आदी शासकीय व निमशासकीय कार्यालयातून जवळपास पाचशेहून अधिक अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहे. त्यांच्या निरोप समारंभावर यंदा "कोरोना' चे सावट आहे. त्यामुळे कार्यालय पातळीवर शनिवारीच अनेक ठिकाणी निरोप समारंभ पार पडले. तर उर्वरीत निवृत्त मंडळींना सोमवारी (ता.1) निरोप दिला जाईल. निवृत्त होणाऱ्यांची एका अर्थाने "सेकंड इनिंग' सुरू होत असून त्यांच्यापुढे निवृत्तीनंतरचे जीवन सुखाने जगण्याचे अनेक पर्याय असतील. 

या विभागातून इतके निवृत्त- 
जिल्हा परिषदेतून यंदा सर्वाधिक 113 जण निवृत्त होत आहेत. त्यामध्ये शिक्षक 64 असून विविध विभागातील 49 कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या खालोखाल एसटी तील चालक-वाहक 99, महसुलचे 61, पाटबंधारेचे 28, पोलिस दलातील 30, वीज कंपनीतील 26, महापालिकेचे 18, सिव्हीलचे 02 असे 402 कर्मचारी निवृत्त झाले आहेत. तसेच नगरपालिका आणि इतर शासकीय कार्यालयातून जवळपास शंभरजण निवृत्त झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 500 now in second innings