सांगली जिल्ह्यात एक कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादन शक्‍य

घनशाम नवाथे 
Sunday, 7 February 2021

सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या तेजीत सुरू आहे.

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या तेजीत सुरू आहे. जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला असून 15 कारखान्यांनी जानेवारीअखेर 49 लाख टन उसाचे गाळप करून 55 लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन केले आहे.

जिल्ह्यात चालू गळीत हंगामात एकूण 15 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. बंद पडलेला तासगाव, यशवंत आणि जत कारखाना यंदाच्या हंगामात सुरू झाला आहे. तर महांकाली, माणगंगा आणि केन ऍग्रो एनर्जी हे साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू होऊ शकले नाहीत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही; तर दिवाळीनंतर काही कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे.

जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत जानेवारीअखेरपर्यंत 15 कारखान्यांनी 49 लाख टन उसाचे गाळप केले आहे; तर 55 लाख क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन केले आहे. यापैकी तासगाव, यशवंत आणि जत कारखान्यांचे गाळप खूपच कमी आहे. परंतु हे कारखाने सुरू झाल्यामुळे परिसरातील आर्थिक चक्र पुन्हा सुरू झाल्याचे समाधान आहे. 

जिल्ह्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. अद्यापही जवळपास तीन महिने गळीत हंगाम सुरू राहील असे चित्र आहे. हंगामाची सुरवात कमी-जास्त ऊस गाळपाने झाली होती. परंतु शेवटी गाळप अधिक प्रमाणात होईल असा अंदाज आहे. सध्या हंगामाच्या मध्यंतरात हंगाम तेजीत आहे.

शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक गाळप करण्यासाठी कारखान्यांमध्ये स्पर्धा रंगेल असे चित्र आहे. सध्या निम्मा हंगाम संपला तरी अद्याप तेवढाच बाकी आहे. त्यामुळे तुलना केली तर यंदा विक्रमी म्हणजेच एक कोटी क्विंटलहून अधिक साखरेचे उत्पादन होईल असे दिसते. 

हंगामात राजारामबापू साखराळे कारखान्याने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल सोनहिरा, क्रांती कारखाना, दत्त इंडिया या कारखान्यांची साखर जास्त आहे. साखर उताऱ्यामध्ये दालमिया-निनाईदेवी कारखान्याचा उतारा सर्वाधिक 11.95 टक्के इतका आहे. त्यानंतर राजारामबापू वाटेगावचा उतारा सर्वाधिक 11.98 इतका आहे. त्याखालोखाल सर्वोदय, राजारामबापू साखराळे, क्रांती, सोनहिरा हे कारखाने आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than one crore quintals of sugar can be produced in Sangli district