चेरापूंजीपेक्षा महाबळेश्‍वरात सर्वाधिक पाऊस

सिद्धार्थ लाटकर
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पावसाच्या धारांसह धुक्‍यात लपटलेली महाबळेश्‍वरची बाजारपेठ.

सातारा ः जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे देशात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद नुकतीच झाली आहे. याबाबत द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस असल्याचे नमूद केले आहे. 

सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजीची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्याबाबतच्या नोंदीतून हे स्पष्ट होत आहे. द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये महाबळेश्वर येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एक जूनपासून नोंदविलेल्यानुसार महाबळेश्‍वरमध्ये पाच हजार 486 मिलिमीटर तसेच चेरापुंजी येथे पाच हजार 346 मिलिमीटर पाऊस पडल्याचे नमूद केले आहे. 
पाऊस पडण्यासाठी भौगोलिक स्थान आणि वातावरणात आवश्‍यक असणारी पोषक स्थिती उपलब्ध व्हावी लागते. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगा विशिष्ट रचनेत असल्यामुळे पावसासाठी आवश्‍यक असणाऱ्या ढगांसाठी पोषक स्थिती निर्माण होते. ज्यामुळे पाऊस कोसळण्यास मदत होते. या वातावरणाचा अधिक फायदा महाबळेश्वर आणि परिसराला मिळाला. त्यामुळे महाबळेश्वर पावसाच्या नोंदीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आजच्या (रविवार) पावसाच्या नोंदीनुसार महाबळेश्‍वर येथे पाच हजार 949 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी चार हजार 78 इतकी नोंद होती. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More rainfall in Mahabaleshwar than Cherrapunji