कऱ्हाडजवळ जीपने मायलेकीस चिरडले; चालक पसार

राजेंद्र ननावरेे 
मंगळवार, 11 जून 2019

अपघातानंतर पसार होणाऱ्या बोलेरोने एका दुचाकीस्वारासही जोराची धडक दिली आहे. घटनास्थळापसून काही अंतरावरच जीप सोडून चालक पसार झाला आहे. त्याची नोंद पोलिसात झाली आहे. 

मलकापूर (ता. कऱ्हाड) : महामार्गावरून भरधाव पुण्याकडे निघालेल्या बोलेरो जीपचा टायर फुटल्याने जीपने महामार्ग ओलांडणाऱ्या जखिणवाडी येथील मायलेकीस चिरडले. येथील जखिणवाडी फाट्यावर रात्री आठच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. त्यात सुमित्रा तुकाराम वाईकर (वय ४५) व त्यांची मुलगी धरती (१४, मळाईनगर, जखिणवाडी) ठार झाल्या आहेत. सौ. सुमित्रा जागीच ठार झाल्या आहेत. मुलगी धरती हीचा रूग्णालायत उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर पसार होणाऱ्या बोलेरोने एका दुचाकीस्वारासही जोराची धडक दिली आहे. घटनास्थळापसून काही अंतरावरच जीप सोडून चालक पसार झाला आहे. त्याची नोंद पोलिसात झाली आहे. 

पोलिस व घटनास्थळारील माहिती अशी, जखिणवाडी येथील सौ. सुमित्रा कृष्णा रूग्णालयात नोकरी करतात. आज सायंकाळी रूग्णालयातून सुटी झाल्यावर सौ. समित्रा रिक्षाने घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची कन्या धरतीही होती. येथील जखिणवाडी फाट्यावर आल्यावर त्या मुलीसह रिक्षातून उतरल्या. दोघीजणी महामार्ग ओलांडून जखिणवाडीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी कोल्हापूर बाजुकडून भरधाव आलेल्या बोलेरो जीपचा टायर फुटला. त्यामुळे जीपवरील चालकाचा ताबा सुटला. जीपने थेट रस्ता ओलांडणाऱ्या सौ. सुमित्रा व त्यांची कन्या धरती यांना चिरडले. त्यात दोघींचाही मृत्यू झाला. धडक इतक्या जोराची होती की, मुलगी धरती दुभाजकावर आदळली आणि सौ. सुमित्रा यांना जीपने महामार्गाच्या कडेला फरपटत गेली. त्यांच्या अंगावरून जीपचे चाक गेले. त्या जागीच ठार झाल्या तर धरती रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत झाली. अपघातानंतर जीपने जखीणावाडीतीलच दुचाकीस्वारासही धडक दिली आहे. तोही त्यात जखमी आहे. मात्र त्याची माहिती मिळू शकली नाही. जीप काही अंतरावर गेल्यानंतर थांबली. त्याचवेळी चालकाने गाडीतून उडी मारून पोबारा केला. याची नोंद पोलिसात झाली आहे. चालकाचा शोध सुरू होता. मात्र त्याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. अपघातामुऴे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ती सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother and daughter killed in accident near Karhad