सुनेला उंबऱ्यात रोखलं; अख्ख कुटुंब वाचलं 

शंकर भोसले
शुक्रवार, 22 मे 2020

हडको कॉलनीतील या कुटुंबातील मुलगा दिल्लीत कामानिमित्त वास्तव्यास आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर सारा देश थांबला. कोणा कुठे जाणे येथे थांबले. या काळात परराज्यात अडकून पडलेले लोक आपापल्या मूळ गावी परतू लागले. मिरजकर कुटुंबालाही तसेच वाटले. त्यांनी अधिकृत पास काढला, परवानगी घेतली आणि मिरजेचा रस्ता धरला.

मिरज, ता. 21 ः फार दिवसांनी मुलगा आणि सूनबाई दिल्लीहून घरी येणार याचा आनंद एका बाजूला होता आणि कोरोनाच्या साथीची धास्ती दुसऱ्या बाजूला. या दोलायमान स्थितीत सासूबाईंनी थोडा धाडसी निर्णय घेतला. मनावर दगड ठेवला आणि मुलगा-सुनेला उंबऱ्यातच रोखले. दिल्लीहून आलात तर आधी तपासणी करून घ्या, अशी प्रेमळ सूचना केली. त्या दोघांनीही आईचा मान ठेवत रुग्णालय गाठले. तेथे सूनबाईंची तपासणी झाली आणि त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. सुनबाईंना उंबऱ्यात रोखण्याचं सासूबाईंचं धाडस योग्य ठरलं आणि एक कुटुंबच काय तर सारी गल्ली कोरोनाच्या संकटापासून दूर राहिली. 

ही घटना घडली मिरजेतील हडको कॉलनीत. लोक सीमा तोडून शहरात येत आहेत, लपून रहात आहेत, धोका वाढवत आहेत. संकट वाढत आहे. अशा काळात मिरजेतील ही गोष्ट हे संकट नात्यांतील प्रेमाच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावणारं असल्याची जाणीव करून देणारी आहे. त्यामुळे त्या सासूबाईंचे कौतुक आहेच, शिवाय आपल्या आईशी वाद न घातला दवाखान्याचा रस्ता धरणारा मुलगा आणि सासूबाईंच्या विचारांना प्रतिसाद देणाऱ्या सुनबाईचंही कौतुक आहे. 

हडको कॉलनीतील या कुटुंबातील मुलगा दिल्लीत कामानिमित्त वास्तव्यास आहे. कोरोनाचे संकट आल्यानंतर सारा देश थांबला. कोणा कुठे जाणे येथे थांबले. या काळात परराज्यात अडकून पडलेले लोक आपापल्या मूळ गावी परतू लागले. मिरजकर कुटुंबालाही तसेच वाटले. त्यांनी अधिकृत पास काढला, परवानगी घेतली आणि मिरजेचा रस्ता धरला. ते दिल्लीतून मुंबईला आले आणि तेथून त्यांनी मिरज गाठले. घराकडे जाण्याआधी त्यांनी आईशी संवाद साधला. आईला या साऱ्या संकटांची जाणीव होती. ती सावध होतीच. तिने मुलगा आणि सुनेला सूचना केली. आधी रुग्णालयात जा. तपासून घ्या. मोठा प्रवास करून आला आहात. ते साऱ्यांसाठी चांगले होईल. रुग्णालयात तपासणी झाली. सुनबाईंविषयी डॉक्‍टरांना थोडी शंका वाटली. त्यांनी स्वॅब घेतले. काल रात्री त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

पुढील चौदा दिवस सुनबाईंवर मिरजेतील कोरोना रुग्णालयात उपचार होतील. पतीसह त्यांच्या संपर्कातील इतरांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या नमुने तपासले जातील. हा काळात आव्हानात्मक असणार आहे. ते नक्कीच कोरोनामुक्त होतील आणि पुन्हा एकदा सून आणि मुलगा त्याच आनंदाने उंबरा ओलांडतील, असा विश्‍वास त्या माऊलीला आहे. हेच शहाणपण साऱ्यांनी दाखवलं असतं तर कदाचित, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कोरोना बाधितांची संख्या काहीअंशी तरी मर्यादित ठेवता आली असती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother in low stop her outside of home and then happened that