आई दवाखान्यात, बाप गेला, मृत्यू लपवावा लागला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

या तीन प्रातिनिधीक सत्य घटना. रोज या घडत आहेत. कुटुंबातील एकाला कोरोनाची बाधा झाली तर अनेकजण बाधित येत आहेत. ज्येष्ठांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. त्यातील कुणाचा मृत्यू झाला तर ती बातमी दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहचू नये, याची काळजी घ्यावी लागतेय.

सांगली ः मृत्यूनंतर शेवटचं तोंड पहावं म्हणतात... एखादा पाहुणा यायचा असेल तर सरणावर मृतदेह ठेवून काही काळ वाट पाहिली जाते... हा भावनिक विषय आहे. कोरोनानं या भावनांशीही खेळ मांडलाय. आई दवाखान्यात आहे, बापाचा मृत्यू झाला... मुलाने मनावर दगड ठेवला आणि ज्याच्यासोबत आयुष्याची चाळीस वर्षे काढली त्या पतीच्या मृत्यूची बातमीही आपल्या आईपर्यंत पोहचू दिली नाही. बाप तर गेलाय, आई जगली पाहिजे, यासाठी त्यानं मन घट्ट केल. मिरज तालुक्‍यातील काळीज पिळवटून टाकणारी ही घटना. 

दुपारी 1 वाजता फोनवर बोललेला बाप अचानक गेला. मुलगी फोन करून दमली. त्यांनी उचलला नाही. पाच वाजता मोबाईल स्वीच ऑफ. सात वाजता फोन आला... तुमचे वडील गेलेत. दुपारी मृत्यू झालाय, रात्री अकरापर्यंत पोहचा, अंत्यसंस्कार करायचे आहेत. शिराळा तालुक्‍यातील धक्कादायक घटना. त्यांचा लहान मुलगा कसातरी दुचाकी घेऊन आला. अंत्यसंस्काराला थांबला अन्‌ निघून गेला... बापाचं शेवटचं दर्शन झालच नाही. 

परगावी नोकरी करणाऱ्या मुलाला कोरोना संशयित म्हणून सांगलीत शासकीय रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांनी रिपोर्ट आला तो निगेटिव्ह आहे, मात्र गावी त्याला कोरोना झाल्याची बातमी पसरली. तिथे त्याचे वडील गेले. त्याला सांगितलं गेलं नाही. शेवटच्या क्षणाला त्याला कल्पना दिली. त्याला यायला मज्जाव केला. बापाचं तोंडही त्याला पाहता आलं नाही. वाळवा तालुक्‍यातील घटना. 

या तीन प्रातिनिधीक सत्य घटना. रोज या घडत आहेत. कुटुंबातील एकाला कोरोनाची बाधा झाली तर अनेकजण बाधित येत आहेत. ज्येष्ठांना रुग्णालयात भरती करावे लागत आहे. त्यातील कुणाचा मृत्यू झाला तर ती बातमी दुसऱ्या रुग्णापर्यंत पोहचू नये, याची काळजी घ्यावी लागतेय. त्याला धक्का बसू नये, यासाठी ही खबरदारी घेताना कुटुंबियांनी काळजावर दगड ठेवलाय. भावनिक परीक्षेची वेळ अनेक कुटुंबियांवर आली आहे. ती परीक्षे रोज कितीतरी कुटुंब देत आहेत. दररोज फेसबूकवर श्रद्धांजलीच्या पोस्ट वाचून अनेकांना धक्का बसतोय. सुन्न झालेय सगळे. काल परवा भेटलेला माणूस आज नाही, हे पचवणारे मित्रांना कठीण जात आहे. कोरोना रोज सत्वपरीक्षा घेतोय. कुटुंब हादरवून टाकतोय. मुलाला कोरोना झाला, त्याचं बील कसं भरू या भितीने बापाला गळफास घ्यायला लावतोय. सारं सुन्न करणारं वातावरण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother went to the hospital, father went, death had to be hidden