राज्यातील कला शिक्षक-शिक्षकेतरांचे काळ्या फिती लावून आंदोलन....यांच्या राजीनाम्याची केली मागणी

art teacher.jpg
art teacher.jpg

सांगली- राज्यातील कला संचालनालयाचे प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांच्या मनमानी कारभाराविरोधात राज्यातील चित्रकला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तीन संघटना एकत्रित आल्या आहेत. श्री. मिश्रा हे जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध केला जाणार आहे. आजपासून आंदोलनास राज्यभर सुरवात झाली. 

तिन्ही संघटनांनी दिलेली माहिती अशी, कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली राज्यात सुमारे 172 अनुदानित व विनाअनुदानित कला महाविद्यालये आहेत. चित्रकला व शिल्पकला शिक्षणासाठी कार्यरत देशातील एकमेव संचालनालय आहे. 1965 साली स्थापन कला संचालनालयाच्या संचालकपदी आतापर्यंत चित्रकला किंवा शिल्पकलेतील कलावंत अथवा अध्यापकांची निवड केली जाते. परंतू श्री. मिश्रा वास्तुविशारद असून त्यांना या क्षेत्रातील काही माहीती नाही. गेली पाच वर्षे त्यांनी कला क्षेत्राची वाट लावली आहे. 

दहावी- बारावीचे निकाल लागून दोन महिने झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर शाळा महाविद्यालये जून-जुलै पासूनच ऑनलाइन प्रक्रियेद्वारे सुरू आहेत. या धर्तीवर कला महाविद्यालये सुरू करावीत म्हणून महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर संघ (महाकॅटना), द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूशन आणि कला महाविद्यालय संघ प्रयत्नशील आहे. तत्काळ निर्णय व्हावा म्हणून तीनही संघटनांनी लेखी व तोंडी विनंती केली. गतवर्षीच्या परीक्षा व निकाल, सत्रारंभाचे परिपत्रक, प्रवेश प्रक्रियेचे वेळा पत्रक आणि ऑनलाइन कलाध्यापन इत्यादींबाबत कला संचालकांनी काहीच केले नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

परिणामी विद्यार्थी, पालक आणि कलाध्यापक यांच्यामध्ये कला संचालकांबद्दल असंतोष वाढतोय. त्यांच्या मनमानीविरोधात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार केली आहे. मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अन्यथा तोपर्यंत काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला जाईल अशी भूमिका तीनही संघटनांनी घेतली असून आजपासून राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. सांगलीतील कलाविश्व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. प्राचार्य लक्ष्मण लोहार, प्रा. बाळासाहेब पाटील, प्रा. मधुकर कराळे, प्रा. सत्यजित वरेकर, प्रा. शशिकांत जगताप, सुनील बोरगावकर, गणेश नायकोडे, संतोष पाटील उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com