वादग्रस्त घनकचरा प्रकल्पाच्या अंतिम मान्यतेसाठी हालचालींना वेग

बलराज पवार 
Thursday, 20 August 2020

वादग्रस्त घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची सत्ताधारी भाजपची मागणी असतानाही प्रशासनाने निविदा उघडल्या आहे. आता अंतिम मान्यतेसाठी त्या स्थायी समितीसमोर आणल्या आहेत.

सांगली : वादग्रस्त घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची सत्ताधारी भाजपची मागणी असतानाही प्रशासनाने निविदा उघडल्या आहे. आता अंतिम मान्यतेसाठी त्या स्थायी समितीसमोर आणल्या आहेत. दोन कामांच्या निविदांवर 21 ऑगस्टच्या स्थायी समिती सभेत दरमान्यता घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील बैठकीत शिक्कामोर्तब होईल. या पार्श्‍वभुमीवर महापालिकेतील तीनही राजकीय पक्षांतर्गत हालचाली गतीमान झाल्या आहेत. 

या प्रकल्पाला कॉंग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैन्नुद्दीन बागवान यांनी आधीच विरोध केला आहे. श्री. साखळकर यांनी लेखी त बागवान यांनी तोंडी विरोध केला आहे. त्यापैकी साखळकर यांनी पक्षाचा विरोधाचा निर्णय झाला आहे. स्थायीतील पक्षाचे सदस्य नगरसेवक या निर्णयाचे पालन करतील, असे सांगितले. तर बागवान यांनी आम्ही उद्या अकरा वाजता शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलावली आहे. या बैठकीत आमची भूमिका ठरेल. त्याचे पालन आमचे तीनही सदस्य पालन करतील. आमचे सदस्य पक्षाशी निष्ठावान असल्याने त्यांच्यासाठी व्हिप काढायची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. 

सर्वाधिक कोंडी भाजपची झाली आहे. सभापती संदिप आवटी यांनी हा विषय अजेंड्यावर घेतल्याने भाजपमधील मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, आमदार सुधीर गाडगीळ यांनी आमचा विरोधाचा निर्णय झाला आहे. स्थायीतील आमचे सर्व सदस्य या विषयाला विरोध करतील, असे त्यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. 

उद्या (ता. 20) च्या बैठकीत सुमारे 75 कोटींचे विषय सभेसमोर मंजुरीसाठी आणले आहेत. त्यात कचऱ्याबरोबरच अन्य विषयही आहेत. त्यात तीन कोटींची औषध खरेदीचा विषय आहे. विविध 30 प्रकाराचे औषधे, किटकनाशके पुढील तीन वर्षासाठी खरेदी करण्यासाठी तीन कोटी 10 लाख 53 हजार रूपयांची निविदा काढली होती. यासाठी सात कंपन्यांनी निविदा भरली असून दरकरार पध्दतीने मंजुरी देण्यात येणार आहे. 

महापालिका लावणार बांबू 
महापालिका हद्दीतील नैसर्गिक नाल्यांच्या बफर झोनमध्ये बांबूची झाडे लावण्यासाठी तब्बल जगवण्यासाठी 33 लाख 10 हजार 200 रूपयांची निवीदा मागण्यात आली होती. या कामासाठी 22 टक्के कमी दराची निवीदा दाखल झाली आहे. यावरही उद्या शिक्कामोर्तब होईल. सध्या या सर्व ओतभागात बाभळी, पाणगवत आहे. तिथे महापालिका बांबू लावण्याचा पराक्रम करणार आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movement for final approval of solid waste project