esakal | Sangli | विरोधकांची मोट बांधण्यासाठी हालचाली
sakal

बोलून बातमी शोधा

जयंत पाटील

सांगली : विरोधकांची मोट बांधण्यासाठी हालचाली

sakal_logo
By
घनश्‍याम नवाथे

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धमाका दिवाळीनंतर उडणार आहे. चार राजकीय पक्षांनी दारूगोळा जमा केला आहे. भाजप-शिवसेनेने स्वबळाचा बार उडवण्याची घोषणा केली आहे. तर बँकेवरील पकड कायम ठेवून बिनविरोधचा धमाका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे डावपेच सुरू आहेत. जागा वाटपाचा ‘फॉर्म्युला’ आणि त्याची बेरीज ते कशी जमवतात यावर निवडणुकीचे चित्र ठरेल. निवडणूक झालीच तर संचालकांशी संबंधित साडेपाचशे कोटींची कर्जे हाच मुद्दा गाजणार आहे.

जिल्हा बँकेत साधारण ४० वर्षापूर्वी सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्याकडे बँकेचे नेतृत्व होते. वसंतदादांनी त्यांच्याकडे धुरा सोपवली होती. तो काळ बँकेत राजकारण नाही असा होता. काळानुरुप बँकही राजकारणाचा अड्डा झाली आणि आज त्याचे स्वरुप आपण अनुभवत आहोत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले. या काळात सारे काही शांत असताना ‘केन ॲग्रो’च्या कर्जप्रकरणावरून बँकेतील संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर आला. एनपीएच्या उंबरठ्यावरील कर्जे हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. सुमारे साडेपाचशे कोटींची कर्जे संचालकांशी संबंधित संस्थाची आहेत. त्यामुळे संघर्ष टाळून बिनविरोधसाठी सर्वजण एकत्रित येतील असे चित्र आहे.

हेही वाचा: BJP घेणार अध्यक्ष, सभापतींचे राजीनामे ; आता संजयकाका, देशमुख बोलणार

एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. पूर्वीचीच मंडळी इच्छुक असली तरी नव्याने काही वजनदार मंडळी बँकेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या नेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राजकीय पक्षानुसार बलाबल पाहिले तर राष्ट्रवादीचे १२, कॉंग्रेसचे सहा, भाजपा दोन आणि शिवसेना एक असे चित्र आहे. कॉंग्रेस, भाजपा आणि शिवसेना नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांना जागा वाढवून हव्या आहेत. तशातच चारही पक्षात इच्छुक वाढलेत. त्यामुळे बँकेत विद्यमान काही संचालकांसह नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. जवळपास ७० टक्के जुनी मंडळी असतील तर ३० टक्के नवे चेहरे असतील.

जयंत पाटील यांना बँकेवर पकड कायम राहील का हे निवडणुकीनंतर ठरेल. त्यांच्याविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, खासदार संजय पाटील, विशाल पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याही भूमिका निर्णायक असतील. आठवडाभरात अंतिम चित्र कळेल. संस्थात्मक बांधणीवरच या निवडणुकीचे यश ठऱते. विद्यमान काही संचालकांनी ती जुळणी आधीच केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत जागा वाटपावर पुढचे चित्र ठरणार आहे. जयंतरावांकडून सर्वांसोबत चर्चा आणि व्यूहरचना सुरू आहे. निवडणूक लागली तरी काही चेहरे कायमच असतील असे दिसते. जयंत पाटील ‘वेट ॲन्ड वॉच’ भूमिकेत दिसतात.

loading image
go to top