तीन खासगी हॉस्पिटल, होस्टेल ताब्यात घेण्याच्या हालचाली

बलराज पवार
Monday, 20 July 2020

महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील तीन खासगी हॉस्पिटल आणि महाविद्यालयांची होस्टेल ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील तीन खासगी हॉस्पिटल आणि महाविद्यालयांची होस्टेल ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. तेथे कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. या ठिकाणी कोरोनाबाधितांसाठी आयसोलेशन वॉर्ड केले जाणार आहेत. उद्या सोमवारपासूनच हे सर्व सुरु होतील. 

महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडाभरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत असलेले मिरजेतील कोरोना रुग्णालयामध्ये बेड शिल्लक नाही. तर मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि क्रीडा संकुलातही रुग्ण वाढल्याने तेथेही जागा शिल्लक नाही. त्यामुळे नव्याने पॉझिटीव्ह येणाऱ्या रुग्णांसाठी तातडीने आयसोलेशन वॉर्ड, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनसाठी हॉस्पिटल, होस्टेल उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु आहेत. 

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांच्यासह अधिकाऱ्यांनी आज शहरातील काही खासगी हॉस्पिटलची पाहणी करुन ती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली. तसेच काही महाविद्यालयांची होस्टेलचीही पाहणी करुन तेथेही रुग्ण ठेवण्याबाबत हालचाल सुरु केली आहे. या हॉस्पिटल आणि होस्टेलमध्ये कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. यामुळे कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार सुरु होऊ शकतील. 

गेल्या काही दिवसात महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने रुग्ण सापडले होते. काही हॉस्पिटलमध्ये रुग्ण सापडल्यानंतर त्या हॉस्पिटलनाच क्वारंटाईन सेंटर करण्यात आले. तर गेल्या आठवड्यात एकाचवेळी 52 रुग्ण सापडलेल्या सावली बेघर निवारा केंद्रातच क्‍वारंटाईन सेंटर सुरु केले. तेथेच आयसोलेशन वॉर्ड करुन उपचार करण्यात येत आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या पाहून प्रशासनाने शहरातील तीन खासगी हॉस्पिटल आणि होस्टेल आज तातडीने ताब्यात घेतली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movements to take over three private hospitals, hostels