जिल्ह्याच्या नेतेपदासाठी खासदार महाडिकांची तयारी 

जिल्ह्याच्या नेतेपदासाठी खासदार महाडिकांची तयारी 

कोल्हापूर - राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्ह्यात एकहाती नेतृत्व होते. सुरवातीला सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले. त्यानंतर आमदार हसन मुश्रीफ राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते झाले. आता खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व मिळविण्यासाठी थेट आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोरच दंड थोपटले आहेत. सध्या ताकदीचा अंदाज घेत नुसतीच खडाखडी सुरू आहे. प्रत्यक्ष डावपेचाला सुरवात होईल, त्यावेळी मात्र या कुस्तीची रंगत वाढणार आहे. 

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्ह्यात कधीही फारशी गटबाजी नव्हती. अर्थात प्रत्येक आमदाराने एकमेकाच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्याचे टाळल्यामुळे वादावादीचे प्रसंग आले नाहीत. सुरवातीच्या काळात कै. सदाशिवराव मंडलिक यांनी पक्षाचे नेतृत्व केले. जिल्हा बॅंकेतील राजकारणावरून त्यांचे शिष्य आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी वितुष्ट आले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे आमदार मुश्रीफ यांनी मंडलिकांविरुद्धच दंड थोपटले आणि जिल्ह्याचे नेते बनले. या काळात मंडलिक विरुद्ध मुश्रीफ वाद खूप गाजला. अखेरपर्यंत सदाशिवराव मंडलिक व मुश्रीफ एकत्र आले नाहीत. 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र मुश्रीफ राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू शकले नाहीत. त्यावेळी बंडखोरी करून अपक्ष म्हणून लढलेले सदाशिवराव मंडलिक विजयी झाले होते. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव प्रा. संजय मंडलिक शिवसेनेकडून उतरले. त्यावेळी राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? असा प्रश्‍न मुश्रीफ यांच्यासमोर होता. मुश्रीफ यांचेच नाव लोकसभेसाठी अग्रक्रमावर होते; पण त्यांना लोकसभेवर जायचे नव्हते म्हणून त्यांनी धनंजय महाडिक यांचे नाव सुचविले. राष्ट्रवादीतर्फे त्यांना उमेदवारी दिली आणि निवडून आणले. एवढेच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्यातील वादही मिटविण्याचा प्रयत्न केला. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर हे चित्र लगेच बदलले. मात्र या घटनेमुळे आमदार पाटील व आमदार मुश्रीफ यांची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच गट्टी जमली. पुढे आमदार पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाडिक यांच्या विरोधात शड्डू ठोकण्यास सुरवात केली. त्यामुळे महाडिक व आमदार पाटील यांच्यातील तेढ वाढतच गेली. श्री. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात आमदार पाटील यांच्यासोबत असल्यामुळे त्यांच्यावरील महाडिक कुटुंबाचा राग वाढत गेला. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना मदत केल्यामुळे मुश्रीफांना अडचणीत आणण्याची महाडिक यांनी तयारी सुरू केली. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेतृत्व आपल्याकडे असते तर विधान परिषदेला मदत झाली असती, असे खासदार महाडिक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षात राहूनच मुश्रीफांना शह देण्याची तयारी सुरू केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मुहूर्त साधत खासदार महाडिक यांनी पक्षात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा दोघांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा. आमदार पाटील व आमदार मुश्रीफ यांचा दोस्ताना पाहून राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमातच खासदार महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसविरोधी सर्व पक्षांची आघाडी करणार असल्याचे जाहीर केले. आमदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे जाहीर केल्यामुळे खासदार महाडिक यांनी आमदार मुश्रीफांच्या एकहाती कारभाराला हादरा दिल्याचे बोलले जाते. भाजपमध्ये सध्या तरी महाडिक यांच्याच शब्दाला वजन आहे. राष्ट्रवादीचे खासदार असूनही महाडिक यांना जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतच फारसे कोणी गांभीर्याने घेत नसल्याने त्यांनी आता पक्षातील आपले वजन वाढविण्यासाठी मुश्रीफ यांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस विरोधी आघाडी करण्याचे घोषित करून खासदार महाडिक यांनी मुश्रीफ यांच्या मर्मावर बोट ठेवत आपल्या पुढील राजकारणाची चाल स्पष्ट केली आहे. 

अडथळा दूर करण्यासाठी 
राष्ट्रवादीमध्ये यापूर्वी मंडलिक व आमदार मुश्रीफ यांच्यातील वाद अनेक वर्षे रंगला. आमदार मुश्रीफ यांना मंडलिकांनीच राजकारणात आणले होते. त्यांनाच बाजूला करत मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. धनंजय महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वत: आमदार मुश्रीफ यांनी प्रयत्न केले. आता खासदार महाडिक यांनीच पक्षात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी आमदार मुश्रीफ यांचा अडथळा आहे. तो अडथळा दूर करण्याचे काम खासदार महाडिक यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हाती घेतले असल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com