स्वाभिमानीला 'या' तीन जागा दिल्यास महाआघाडीत सहभाग

रविंद्र पाटील
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

" महाआघाडीच्या नांदेड येथील सभेसाठी निमंत्रण आले आहे. बुलढाण्यासाठी रविकांत तुपकर, वर्ध्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते व हातकणंगलेतून मला स्वतःला उमेदवारी संघटनेतून दिली जाणार आहे. सात जागांची मागणी महाआघाडीकडे केली आहे. परंतु तीन जागेवर समाधानी आहे."

खोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार आहे, अशा माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. बुलढाणा, वर्धा व हातकणंगले या लोकसभेच्या जागा बाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल अशी आशाही श्री शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. 

श्री. शेट्टी खोची (ता. हातकणंगले) येथे रस्ता कामाच्या प्रारंभ कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. शेट्टी म्हणाले, महाआघाडीच्या नांदेड येथील सभेसाठी निमंत्रण आले आहे. बुलढाण्यासाठी रविकांत तुपकर, वर्ध्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते व हातकणंगलेतून मला स्वतःला उमेदवारी संघटनेतून दिली जाणार आहे. सात जागांची मागणी महाआघाडीकडे केली आहे. परंतु तीन जागेवर समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महाआघाडीत सहभागी झाल्यानंतर शेतकऱ्यांना सविस्तर  कारण समजावून सांगितले जाईल. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार महाआघाडीशी चर्चा सुरू आहे.

लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किमान तीन खासदार निवडून आल्यास शेतकऱ्यांसाठी चांगल्या पध्दतीने काम करता येईल असेही श्री शेट्टी म्हणाले. साखर कारखान्यांना एफआरपीची रक्कम द्यावीच लागेल. त्यापेक्षा जादा दर मिळणे कठीण आहे. असे सध्या चित्र आहे. मोदी सरकार विरोधात जनतेतून नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षात असताना जे बोलत होते, तसे आता बोलत नाहीत.त्यामुळे त्याचा तोटा त्यांना होणार आहे, असेही श्री शेट्टी म्हणाले.

Web Title: MP Raju Shetty comment