बाधित एसटी कर्मचाऱ्याचा मुंबई प्रवास; अहवाल प्रलंबित असताना ड्युटी

घनशाम नवाथे 
Thursday, 15 October 2020

मुंबईत लोकल सेवा बंद असल्यामुळे "बेस्ट' च्या मदतीसाठी सांगली जिल्ह्यातील एसटी चालक व वाहक धावलेत. कवठेमहांकाळ आगारातील एकाचा "कोरोना' चाचणी अहवाल प्रलंबित असताना कारवाईची जाणीव करून देत मुंबई ड्युटीवर पाठवल्यानंतर अहवाल "पॉझिटीव्ह' आल्यामुळे खळबळ उडाली.

सांगली : मुंबईत लोकल सेवा बंद असल्यामुळे "बेस्ट' च्या मदतीसाठी जिल्ह्यातील एसटी चालक व वाहक धावलेत. कवठेमहांकाळ आगारातील एकाचा "कोरोना' चाचणी अहवाल प्रलंबित असताना कारवाईची जाणीव करून देत मुंबई ड्युटीवर पाठवल्यानंतर अहवाल "पॉझिटीव्ह' आल्यामुळे खळबळ उडाली. एस. टी. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध संतापाची लाट पसरली आहे. 

मुंबईत रेल्वेची लोकल सेवा बंद असल्यामुळे "बेस्ट' च्या मदतीसाठी एस. टी. महामंडळ धावले. सांगली विभागातून देखील आतापर्यंत दोनशे चालक, दोनशे वाहक आणि इतर 50 कर्मचारी असा 450 जणांचा ताफा गाड्यांसह तेथे पोहोचला. जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी मुंबईत सेवा करण्यासाठी तत्परता दर्शवली. सेवा बजावणाऱ्यांना वाईट अनुभव येत आहे. 

कवठेमहांकाळ आगारातील एकाने कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर चाचणी केली. अहवाल प्रलंबित असतानाच त्याला मुंबईला जाण्याचा आदेश आला. त्याने अहवाल प्रलंबित असल्यामुळे विनंती केली. ती धुडकावत कारवाई होऊ शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. कर्मचारी नाईलाजाने मुंबईस गेला. तेथे गेल्यानंतर अहवाल "पॉझिटीव्ह' आला. तयाच्यासमवेत गेलेले कर्मचारी, प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानीने कोरोना "पॉझिटीव्ह' कर्मचाऱ्यास सांगली - मुंबई प्रवास करावा लागला. कर्मचाऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. 

आगारव्यवस्थापक निलंबित करा 

एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत म्हणाले,""कोरोना अहवाल प्रलंबित असताना कर्मचाऱ्यास मुंबईला पाठवणाऱ्या कवठेमहांकाळ आगार व्यवस्थापकास तातडीने निलंबित करावे अशी मागणी केली आहे.'' 

भितीपोटी गेला.. ऍडमिट झाला- 
एका कर्मचाऱ्यास डेंग्यूसदृष्य आजारामुळे हालचाल करता येत नव्हते. त्याचीही विनंती धुडकावली गेली. तो कसाबसा मुंबईत गेला. परंतू त्रास जाणवू लागल्यामुळे बांद्रा येथे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची माहिती श्री. खोत यांनी दिली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai journey of Corona positive ST employee; Duty while report pending