मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत महापालिका आयुक्तांची भाऊबीज 

बलराज पवार
Tuesday, 17 November 2020

सांगली-  सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविडने मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी करून या कुटुंबांना आधार दिला. 

सांगली-  सांगली महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कोविडने मृत्युमुखी पडलेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांसोबत भाऊबीज साजरी करून या कुटुंबांना आधार दिला. 

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी होत आहे. पण, कोरोनाचा सामना करताना महापालिकेचे काही कर्मचारी मृत्युमुखी पडले. या कर्मचाऱ्यांच्या घरी मात्र शांतता होती. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी बलिप्रतिपदा आणि भाऊबीजच्या दिवशी मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात जाऊन भाऊबीज साजरी केली. त्यांना आधार देत भेटवस्तू दिल्या. यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय गहिवरून गेले. 

सांगली महापालिका क्षेत्रात कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना महापालिकेचे दहा कर्मचारी कोविडमुळे मृत्युमुखी पडले. आपला जीव धोक्‍यात घालून कोरोनाला रोखण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे केले कर्तव्य बजावले. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे यंदा या कर्मचाऱ्याच्या घरी दिवाळी साजरी झाली नाही. आपला माणूस कर्तव्य बजावत असताना मृत झाला त्यामुळे या कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. त्यामुळे आपला माणूस गमावलेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी मृत कर्मचाऱ्याच्या 
कुटुंबियांना आयुक्त कापडणीस यांनी आधार देत त्यांना धीर दिला. आयुक्त कापडणीस यांच्यासह उपायुक्त राहुल रोकडे आणि महापालिकेचे क्रीडाधिकारी महेश पाटील, प्रमोद रजपूत यांनीही मयत कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबाला धीर दिला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिलेल्या आधारामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे कुटुंब गहिवरुन गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Commissioner's bhaubeej with the families of the deceased employees