ही महापालिका आहे कोरोना शतकाच्या उंबरठ्यावर; आठ नवे कोरोनाबाधित

बलराज पवार
Sunday, 12 July 2020

सांगली महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे.

सांगली : महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता शतकाच्या उंबरठ्यावर आहे. आज दिवसभरात एका खासगी लॅबच्या दोन रिपोर्टसह आठ नवे रुग्ण वाढले. यामध्ये सांगलीचे पाच तर मिरजेचे दोन आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा आकडा आता 98 वर गेला आहे. 

महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या दररोज वाढतच चालली आहे. शहरातील नवीनच भागात रुग्ण आढळून येत आहेत. आज शहरातील वारणालीतील हॉटेल आमंत्रणच्या परिसरात एका 25 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका रुग्णालयात संबंधित महिला वैद्यकीय सेवा करतात. याच परिसरात असणाऱ्या कृष्णाई वसाहतीमधील 36 वर्षीय महिलाही पॉझिटिव्ह आली आहे. 

याबरोबरच आज सांगलीतील खणभागातील भांडवले गल्लीतील एक 45 वर्षीय पुरुषाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला. या व्यक्तीला ताप आला होता. त्यामुळे एका खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना मिरजेच्या कोविड हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. दत्तनगर कंटेन्मेंट झोनमधील एका 39 वर्षीय व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने त्यांना मिरज सिव्हीलमध्ये दाखल केले होते. त्यांचाही स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मिरजेतील रेवणी गल्लीतील एक 25 वर्षीय पुरुष आणि साठेनगर येथील एका रुग्णालयात काम करणारी 28 वर्षीय परिचारिकेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये चौघेजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील असून दोन नवे रुग्ण आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी नव्याने रुग्ण आढळून आलेल्या सर्व ठिकाणी भेटी देत कंटेन्मेंट झोनसह खबरदारीच्या उपाययोजनाबाबत सूचना दिल्या. उपायुक्त स्मृती पाटील, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, डॉ. वैभव पाटील, डॉ शबाना लांडगे, डॉ चारुदत्त शहा यांच्या टीमने सांगली आणि मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना केल्या. स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, वैभव कुदळे यांच्यासह याकूब मद्रासी, बंडा जोशी यांच्या पथकाने परिसरात औषध फवारणी केली. 

खासगी लॅबचे दोन अहवाल पॉझिटीव्ह 
कलानगरमधील एक आणि चांदणी चौकातील एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोन्ही व्यक्तींनी खासगी लॅबमध्ये स्वॅब तपासणी करुन घेतली होती. त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर त्यांनी खासगी प्रयोगशाळेत तपासणी करुन घेतली. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यांची पुन्हा प्रशासनाकडून चाचणी होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांनी दिली. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This municipality is on the threshold of the Corona century; Eight new corona