महापालिकेचे 120 खाटांचे कोविड रूग्णालय आजपासून सेवेत

शैलेश पेटकर 
Thursday, 20 August 2020

कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर सांस्कृतिक भवनमध्ये महापालिकेने 120 खाटांचे कोरोना रुग्णालय अवघ्या आठवड्यात उभारले आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असून ऑक्‍सिजनसह अत्याधुनिक सुविधा याठिकाणी देण्यात येणार आहेत,

सांगली : कोल्हापूर रस्त्यावरील आदिसागर सांस्कृतिक भवनमध्ये महापालिकेने 120 खाटांचे कोरोना रुग्णालय अवघ्या आठवड्यात उभारले आहे. उद्यापासून हे रुग्णालय कार्यान्वित होणार असून ऑक्‍सिजनसह अत्याधुनिक सुविधा याठिकाणी देण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,""महापालिका क्षेत्रात काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होतांना दिसत आहे. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याने महापालिकेने रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. आदिसागर सांस्कृतिक भवनात 13 ऑगस्ट रोजी रुग्णालय उभारण्याचे काम सुरू केले. अवघ्या सात दिवसात 120 खाटांचे रुग्णालय तयार झाले आहे. याठिकाणी शंभर खाटा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी तर 20 खाटा संशयितांसाठी असतील. रुग्णालयात डॉक्‍टरांसह कर्मचाऱ्यांची सहा तासाची ड्युटी असणार आहे तर 14 फिजिशन, 7 मानोसोपचार तज्ज्ञ, 24 निवासी वैद्यकीय अधिकारी असतील. तर एका शिफ्टमध्ये 22 परिचारक, वार्ड बॉय, लॅब-एक्‍सरे टेक्‍निशन, 6 स्वच्छता कर्मचारी असतील. 24 तास ऑक्‍सिजनयुक्त रुग्णवाहिका सज्ज असणार आहे. या रुग्णालयातील रुग्णांची शासनाच्या सर्व पोर्टलवर नोंद राहणार असून शहरातील रुग्णांसाठीच हे रुग्णालय असणार आहे.'' 

ते म्हणाले,""या रुग्णालयासाठी आठ लाखाची रक्कम विविध संस्था संघटनांनी दिलेल्या मदतीतून जमा झाले आहे. 15 लाखाचे साहित्यही लोकांनी भेट स्वरूपात दिले आहे. जीवन ज्योतकडून 10 बेड देण्यात आले आहेत. नगरसेवकांनी मानधन देण्याच्या विचारात आहेत. त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि शिक्षक एक दिवसांचा पगार देणार अशी 18 लाखांची रक्कम रुग्णालयासाठी जमा केली जाणार आहे. या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.'' 
आदिसागर सांस्कृतिक भवनचे शशिकांत पाटील आणि अजितकुमार पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, शहर अभियंता आप्पा अलकुडे, आरोग्यधिकारी सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे उपस्थित होते. 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद 

रुग्णालयात अत्याधुनिक सोईसुविधा देण्यात आल्या आहेत. जुन्या जकात नाका येथे नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स्‌द्वारे रुग्णांच्या नातेवाईकांना संवाद साधता येणार आहे. मनोरंजनासाठी साउंड सिस्टिमही याठिकाणी बसवण्यात आली आहे. सारा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal's 120-bed Kovid Hospital is in service from today