तो नाही म्हणाला अन्‌ मृत्यूजवळ गेला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

साहिल पठाणच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यास प्रथम पाथर्डी येथे व नंतर नगर येथील खासगी दवाखान्यात हलविले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान साहिलचा काल (मंगळवारी) रात्री मृत्यू झाला.

पाथर्डी : हप्ता देण्यास विरोध केल्याने कुऱ्हाडीचे घाव घालून रांजणी येथे बांधकाम मजुराचा खून केल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साहिल पठाण (रा. खोसपुरी, ता. नगर), असे मृताचे नाव आहे. साहेबराव पवार, बुट्ट्या पवार (रा. रांजणी) व अन्य दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. 

बांधकाम मजूर 
रांजणी येथील नवनाथ मारुती घोडके यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका मुबारक अब्दुल पठाण (रा. खोसपुरी) यांनी घेतला आहे. गेल्या 10 दिवसांपासून साहिल पठाण याच्यासह इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण (रा. खोसपुरी) तेथे मजुरीने बांधकाम करीत होते. काम सुरू असताना मंगळवारी (ता. तीन) दुपारी एक वाजता तेथे गावातील आरोपी साहेबराव पवार, बुट्ट्या पवार व त्यांचे दोन साथीदार आले. 

आम्हाला हप्ता द्यावा लागेल 
"आमच्या गावात बाहेरून येऊन मजुरी करायची असेल, तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल,' अशी दमदाटी केली. त्यावरून साहिल पठाण याच्यासोबत आरोपींचा वाद सुरू झाला. घरमालक घोडके यांनी मध्यस्थी करीत संबंधितांना समजावून सांगितले. त्यानंतरही पवार व त्याच्या साथीदारांनी साहिल पठाण यास खंडोबा मंदिराजवळ नेले. 

डोक्‍यात कुऱ्हाडीने वार 
तेथे आरोपींनी साहिल पठाणच्या डोक्‍यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यास प्रथम पाथर्डी येथे व नंतर नगर येथील खासगी दवाखान्यात हलविले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान साहिलचा काल (मंगळवारी) रात्री मृत्यू झाला. याबाबत इरफान हसन पठाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of a construction worker

टॅग्स