esakal | टेम्पो अंगावर घालून तंटामुक्त समिती सदस्याचा खून 

बोलून बातमी शोधा

Murder of a member of a dispute-free committee}

उटगी (ता. जत, जि. सांगली) ते चनगोंड रस्त्यावरील बामणे यांच्या घराजवळ शेत जमिनीच्या वादातून टेम्पो अंगावर घालून एकाचा खून करत एक किलोमीटर गाडीसोबत फरफटत नेल्याची घटना घडली.

टेम्पो अंगावर घालून तंटामुक्त समिती सदस्याचा खून 
sakal_logo
By
बादल सर्जे

उमदी ः उटगी (ता. जत, जि. सांगली) ते चनगोंड रस्त्यावरील बामणे यांच्या घराजवळ शेत जमिनीच्या वादातून टेम्पो अंगावर घालून एकाचा खून करत एक किलोमीटर गाडीसोबत फरफटत नेल्याची घटना घडली. मल्लाप्पा धुंडाप्पा केसगोंड (वय 52, उटगी, ता. जत) असे मृताचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. संशयित भालचंद्र उर्फ भाल्या सिध्दाप्पा केसगोंड (उटगी) हा घटनास्थळावरून पळून गेला. उमदी पोलिस ठाण्यात चिदानंद शिवलींगाप्पा तेली (उटगी) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की उटगी येथील अंकलगी तलावाशेजारी केसगोंड वस्ती आहे. या ठिकाणी मलाप्पा केसगोंड यांची शेतजमीन आहे. ते मालकीच्या शेतात कुटुंबासमवेत राहतात. ते सध्या तंटामुक्त समिती सदस्य म्हणून होते. 

दरम्यान, भालचंद्र केसकोंड व त्यांच्यात 30 वर्षांपासून वाद सुरू होता. वाद इतका टोकाला गेला की, उच्च न्यायालयातही खटला सुरू होता. भालचंद्र शेतजमिनीच्या वादातून वारंवार मल्लाप्पासोबत भांडणे काढत होता. पंच मंडळींनीही अनेक वेळा दोघांची समजूत काढली.भालचंद्र केसगोंड व्यवसायाने वाहन चालक म्हणून काम करतो. तो बोर्गी येथील रुद्रगौडा मलकप्पा बिरादार यांच्या मालकीच्या टेम्पो (एम. एच. 10. झेड 3835) वर चालक म्हणून काम करत होता. 

बुधवारी सायंकाळी भालचंद्र नशेत होता. मल्लाप्पा रात्री आठच्या सुमारास मोटारसायकलवरून मळ्याकडे जाताना पाहून भालचंद्र पाठलाग करू लागला. मल्लाप्पा यांना मागून धडक देत 25 फुटांपर्यंत फरफटत नेले. घटना समजतास शेजारच्या वस्तीवरील लोक व नातेवाईक मिळून जत येथे उपचारासाठी घेऊन जात होते. वाटेतच मल्लाप्पा यांचा मृत्यू झाला. भालचंद्र गाडी घटनास्थळी लावून पसार झाला. 

उमदी पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदनसाठी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट देऊन उमदी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करीत आहेत. 

संपादन : युवराज यादव