
मिरज शहरातील माणिकनगर रस्त्यावर सनशाईन परमिटरूम बारमध्ये झालेल्या मुनीर मुसा शेख ऊर्फ मुन्ना मांगलेकर या तरुणाच्या खुनाचे खरे कारण हे पैशाच्या व्यवहारांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिरज (जि. सांगली) ः शहरातील माणिकनगर रस्त्यावर सनशाईन परमिटरूम बारमध्ये झालेल्या मुनीर मुसा शेख ऊर्फ मुन्ना मांगलेकर या तरुणाच्या खुनाचे खरे कारण हे पैशाच्या व्यवहारांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा खून केल्याप्रकरणी राजू ऊर्फ मन्सुर गौस शेख (वय 31 रा. रेवणी गल्ली) या संशियतास स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली आधिक माहिती अशी, खून झालेला तरुण मुनीर शेख ऊर्फ मुन्ना मांगलेकर आणि राजू ऊर्फ मन्सुर शेख हे नात्यांने सख्खे मावसभाऊ आणि चांगले मित्र आहेत. यापैकी मुन्ना मांगलेकर याचा वाळू विक्रीचा व्यवसाय आहे.
त्याच्याशी राजू ऊर्फ मन्सुर शेख याचे आर्थिक व्यवहारही झाले. याच व्यवहारातून त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला. सोमवारी (ता.11) हे दोघेही माणिकनगर रस्त्यावरील सनशाईन या परमिटरूम बारमध्ये दारू पिण्यासाठी गेले.
त्यांच्यासोबत अन्य एक मित्रही होता. यावेळी दोघांमध्ये याच पैशाच्या व्यवहारातून वाद झाला आणि वाद टोकाला गेल्याने दोघेही भांडत हॉटेलच्या मुख्य हॉलमध्ये आले आणि तेथेच संशयित हल्लेखोर राजू ऊर्फ मन्सुर शेख याने मुसा शेख ऊर्फ मुन्ना मांगलेकर याच्या पोटात चाकुने सलग तीन वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मुन्ना मांगलेकर हा खाली कोसळला.
त्यानंतर संशयित हल्लेखोर मन्सुर शेख याने स्वतःच जखमी मुन्ना मांगलेकर याला रिक्षात घालून खासगी रुग्णालयात नेले आणि रुग्णालयाच्या दारातच त्याला सोडून तेथून पलायन केले. त्यानंतर त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला. यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बोलवाड रस्त्यावरच अटक केली.
संपादन : युवराज यादव