त्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा खून पूर्ववैमान्यस्यातून; पाच जणांना अटक

शैलेश मोहिते
Sunday, 12 July 2020

कुपवाड येथील युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार कंत्राटदार दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, वाघमोडेनगर, कुपवाड) यांचा खून पूर्ववैमान्यस्यातूनच झालाचा उलघडा आज झाला.

सांगली : कुपवाड येथील युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आणि कामगार कंत्राटदार दत्तात्रय महादेव पाटोळे (वय 41, वाघमोडेनगर, कुपवाड) यांचा खून पूर्ववैमान्यस्यातूनच झालाचा उलघडा आज झाला.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 24 तासात पाच संशयित आरोपींना जेरबंद केले असून त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. निलेश विठोबा गडदे (वय 21, वाघमोडेनगर), सचिन अज्ञान चव्हाण (22, आर. पी. पाटील शाळेजवळ), वैभव विष्णू शेजाळ (21, विठुरायाचीवाडी, कवठेमहांकाळ, सध्या रा. वाघमोडेनगर), मृत्युंजय नारायण पाटोळे (27, आंबा चौक, यशवंतनगर), किरण शंकर लोखंडे (19, वाघमोडेनगर) अशी त्यांची नावे आहेत.

जत तालुक्‍यातील जिरग्याळ येथून त्यांना अटक करण्यात आली. 
अधिक माहिती अशी, की दत्तात्रय पाटोळे मिरज औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री स्टार्चमध्ये कर्मचारी पुरवत होते. कामगार कंत्राटदार आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून ते सर्वत्र परिचित होते. काल दैनंदिन कामानिमित्त ते मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये सकाळी गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास तेथून ते कुपवाडकडे दुचाकी (एमएच 10 डीसी 7002) वरून येत होते.

मिरज आणि कुपवाड औद्योगिक वसाहतीच्या सीमेवर हॉटेल अशोकासमोर ते आले. त्यावेळी पाठलागावर असलेल्या संशयित पाचही जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. पाटोळे यांनी दुचाकी बाजूला टाकून जीवाच्या आकांताने समोरच असलेल्या रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये धाव घेतली. पाठोपाठ हातात धारदार शस्त्रे घेऊन संशयित धावले. थेट डोक्‍यावर तलवार व कोयत्याचे वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. 

संशयितांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी तातडीने तीन पथके तयार केली. कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आले होते. तसेच एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकही शोधासाठी रवाना झाले होते. जत येथील जिरग्याळ येथे संशयित लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ धाव घेत अटक करण्यात आली. मुख्य संशयित निलेश गडदे याच्याकडे अधिक चौकशी केली असता पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून साथीदारांसह खून केल्याची कबुली दिली. पाचही जणांना अटक करण्यात आली. कारवाईत उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, प्रदीप चौधरी, शरद माळी, सागर पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, अमित परीट, शशिकांत जाधव, अनिल कोळेकर, सुहैल कार्तियानी, आर्यन देशिंगकर, अरूण सोकटे यांचा सहभाग होता. 

मुख्य संशयित कबड्डीपटू 
मुख्य संशयित आरोपी निलेश गडदे हा कबड्डीपटू असून सांगलीतील एका प्रसिद्ध मंडळाकडून तो खेळत होतो. अन्य संशयित त्याचे मित्र आहेत. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murder of that NCP leader was pre planned & by old hetred