विनयभंगानंतर महिलेला विहिरीत ढकलून देऊन खून; देववाडीतील प्रकार

भगवान शेवडे
Saturday, 23 January 2021

देववाडी (ता. शिराळा, जि. सांगली ) येथील 35 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

मांगले : देववाडी (ता. शिराळा, जि. सांगली ) येथील 35 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. काल (ता. 21) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी धनाजी ऊर्फ निवास पंडित खोत (वय 22) या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आज सकाळी संशयितास कठोर शिक्षा व्हावी म्हणून सुमारे तीन तास देववाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.

पोलिसांकडून माहिती मिळाली, की मांगले-चिकुर्डे रस्त्याच्या दरम्यान लादेवाडी हद्दीतील देसकत शिवारात काल दुपारी संबंधित महिला शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेली होती. संशयित धनाजीने ती महिला एकटी असल्याचे पाहून विहिरीशेजारी तिच्यावर जबरदस्तीचा प्रयत्न केला. विनयभंग करून महिलेला विहिरीत ढकलून दिले. मृत महिलेचा मुलगा सायंकाळी सहाच्या सुमारास शेतात गेला.

त्यावेळी संशयित त्या ठिकाणी विवस्त्रावस्थेत दिसला. त्यानंतर त्याने उसाच्या शेतात पळ काढला. महिलेच्या कुटुंबीयांनी गावांत व कुटुंबीयांना माहिती सांगितली. माहिती दिल्यानंतर शिराळा पोलिसांना तत्काळ संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. महिलेचा विनयभंग करून विहिरीत टाकल्याचे सांगितले. 

ग्रामस्थांनी विहिरीतील पाणी उपसण्यास सुरवात केली. आज सकाळी पाणी कमी झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

मृत महिलेच्या नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक होते. ग्रामपंचायतीजवळ सकाळी नऊ वाजता ते जमले. "संशयिताला आम्हीच शिक्षा देणार. त्याला आमच्या ताब्यात द्या. त्याच्या कुटुंबीयांना गावबंदी करा', असा पवित्रा त्यांनी स्थानिक नेते व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर घेतला. त्यामुळे दोन तास तणावाचे वातावरण होते. दूध संस्थेचा सायरन वाजवून ग्रामसभा झाली. पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठराव घेऊन संशयितासह कुटुंबालाही शिक्षा व्हावी, अशा मागणीचा निर्णय झाला. गावातील विकृत प्रवृती व हुल्लडबाजांवरही कारवाई करावी, अशीही मागणी झाली. 

वरिष्ठ पोलिस अधिकारी जागेवर येईपर्यंत उठायचे नाही असा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला. शिराळ्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल पाटील आले. त्यांनी सखोल तपास व कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने तपासाची ग्वाही दिली. मृत महिलेच्या पतीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितास अटक करण्यात आली, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

व्हिसेरा ठेवला राखून 
उत्तरीय तपासणीत मृतदेहावर नखांचे ओरखडे ओढल्याने अत्याचार झाल्याचा संशय आहे. त्यामुळे व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन पाण्यात पडून मृत्यू झाला आहे, असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी झुबेर मोमीन यांनी सांगितले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder by pushing a woman into a well after molestation in Devwadi