
दुचाकीने पाठलाग करत दुकानदाराचा खून
मांजरी : कात्राळ येथील रहिवासी व ऐनापूर (ता. कागवाड) गावातील औषध दुकानदाराचा दुकान बंद करून घरी परतत असताना अज्ञातांनी दुचाकीवरून पाठलाग करत धारदार शस्त्राने भोसकून खून केला. सोमवारी रात्री ऐनापूर-कात्राळ रस्त्यावर ही घटना घडली. चिंतामणी बंडगर (वय 26) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद कागवाड पोलिस स्थानकात झाली आहे. या खूनामुळे कात्राळ, ऐनापूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कात्रळ (ता. कागवाड) येथील रहिवासी चिंतामणी बंडगर याने गेल्या दोन महिन्यांपासून ऐनापूर येथे औषध दुकानास प्रारंभ केला होता. आठ महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला आहे. सोमवारी (ता. २) रात्री दहा वाजता औषध दुकान बंद करून आपल्या गावी चिंतामणी बंडगर हा दुचाकीने (एमएच 10 एके 6403) परतत होता. अज्ञातांनी चिंतामणी बंडगर याचा दुचाकीवरून पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमा झाल्याने तो जागीच ठार झाला. धारदार शस्त्राने वार व खून करून मारेकरी पसार झाले. मंगळवारी (ता. ३) सकाळी ही घटना निदर्शनास आली. त्याची माहिती मिळताच घटनास्थळी कागवाड पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रबकवी हे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू ठेवला.
कागवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. घटनास्थळी अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडल पोलिस निरीक्षक शंकर गौडा यांनी भेट देऊन माहिती घेतली. चिंतामणी याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
परिसरात एकच खळबळ
या युवकाचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याचा तपास लावणे म्हणजे पोलिसांसमोर एक आव्हानच आहे. कागवाड पोलिस स्थानक कार्यक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून जबरी चोऱया, खून, मारामारी होत आहेत. अज्ञातांनी युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याने कात्राळ व ऐनापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Murder Shopkeeper Chasing Two Wheeler Incident Yenapur Katral Road Attack Sharp Weapon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..