शिक्षक वडिलांचा मुलावर खुनी हल्ला; तरुण गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

शिक्षक राजेंद्र हिंदुराव गाडेकर ( 53, रा. स्वप्नपुर्ती बंगला, रामकृष्ण परमहंस सोसायटी, शंभरफुटी) यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून जखमी मुलगा प्रतिक याच्यावर मिरजेतील मिशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सांगली ः पैशांसह घर नावावर करण्याचा तगादा लावणाऱ्या मुलावर आज शिक्षक वडिलांनी लोखंडी रॉडने खूनी हल्ला केला. गंभीर अवस्थेतील मुलास रुग्णालयात दाखल करून हा हल्ला अज्ञातांनी केल्याचा बनाव केला. पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी शिक्षकास धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी हल्ल्याची कबुली दिली. हा प्रकार विश्रामबाग येथील रामकृष्ण परमहंस सोसायटीत आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला. 

शिक्षक राजेंद्र हिंदुराव गाडेकर ( 53, रा. स्वप्नपुर्ती बंगला, रामकृष्ण परमहंस सोसायटी, शंभरफुटी) यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून जखमी मुलगा प्रतिक याच्यावर मिरजेतील मिशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गाडेकर सांगलीतील शिक्षण संस्थेत प्राथमिक शिक्षक आहेत. मुलगा मुलगा प्रतिक बॅंकेतील खात्यावर साडेतीन लाख रुपये भरा आणि राहता "स्वप्नपुर्ती' बंगला नावावर करण्यासाठी तगादा लावत होता. यावरून कुटुंबात सतत कलह सुरु होता. आज सकाळीही तेच झाले. रागाच्या भरात गाडेकर यांनी प्रतिकच्या डोकीत लोखंडी रॉड घातला. प्रतिक जखमी अवस्थेत कोसळला. त्यानंतर त्यांनीच त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

रुग्णालयातील पोलिस चौकीत ड्युटीवर असणारे पोलिस ए. एम. भोळे यांनी चौकशी केली असता. दोघा अज्ञातांनी घरात घुसून प्रतिक यास मारहाण केल्याची माहिती दिली. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. जखमी प्रतिक याच्या वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी अज्ञातांनी मारहाण केल्याचा बनाव केला. 

त्यानंतर पोलिसांनी बंगला व आजुबाजुच्या परिसरात चौकशी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर वडिलांनीच हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. सखोल चौकशी करता त्यांनी कबुली दिली व कारण सांगितले. प्रतिकला मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून प्रकृती चिंताजनक आहे. सहायक निरीक्षक एस. व्ही. वर्धन अधिक तपास करीत आहेत. 

संपादन - शैलेश पेटकर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderous attack on a child by a teacher father; Young seriously injured