
कुपवाड शहरातील कापसे प्लॉट येथील तरुणावर पूर्ववैमान्यस्यातून चाकूने हल्ला करण्यात आला.
कुपवाड : शहरातील कापसे प्लॉट येथील तरुणावर पूर्ववैमान्यस्यातून चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणेश तानाजी जाधव (वय 20, परमानंद कॉलनी, कापसे प्लॉट) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कुपवाड पोलिसांनी तातडीने संशयित प्रशांत राजू महाजन (वय 19, रा. कापसे प्लॉट) यास मध्यरात्री अटक केली. त्याच्यासह अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गणेश जाधव हा शिक्षण घेत आहे. कुटुंबासह कापसे प्लॉट येथील परमानंद कॉलनीत राहतो. काल रात्री दहाच्या सुमारास जेवण करून घराबाहेर पडला. बाहेरील गाडीवर तो बसला होता. संशयित त्याच्या घरासमोर राहण्यास आहे.
साडेदहाच्या सुमारास संशयित प्रशांत महाजन व त्याचा मित्र हे गणेश जवळ आले. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वाद घालण्यास सुरवात केली. बाहेर का बसला आहेस, असा जाब विचारत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर प्रशांत महाजन याने चाकूने पोटात वार केला. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर दोघेही पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गणेश यास आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर रात्री मध्यरात्री दोघा संशयितांविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक उबाळे यांनी संशयितास मध्यरात्री अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले.
संपादन : युवराज यादव