मुश्रीफांना खिंडीत गाठण्यासाठी जोडण्या

- रमेश पाटील
बुधवार, 11 जानेवारी 2017

दोन घाटगे, मंडलिकांची होणार गट्टी - जागावाटपाचा तिढा सुटला तर काटा लढती 

दोन घाटगे, मंडलिकांची होणार गट्टी - जागावाटपाचा तिढा सुटला तर काटा लढती 
म्हाकवे - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन घाटगे आणि मंडलिक गट एकत्र येण्याची शक्‍यता आहे. मात्र या तिन्ही गटांमधील जागावाटपाचा तिढा सुटल्यावर या युतीवर शिक्कामोर्तब होईल. यापूर्वीच प्रा. मंडलिक व संजय घाटगे गटाची असणारी युती यापुढेही निश्‍चित मानली जाते. या युतीमध्ये शाहू ग्रुपचे समरजितसिंह घाटगेंना घेत आमदार हसन मुश्रीफांना एकाकी पाडण्याचा जोरदार प्रयत्न होईल. या तिघांची युती यशस्वी झाल्यास मुश्रीफांसमोर राजकीय चक्रव्यूह निर्माण होऊ शकतो; परंतु मुश्रीफ हे कसलेले राजकारणी असल्याने ते कसे भेदतात हे पाहावे लागेल.                           

युतीमध्ये प्रा. मंडलिकांच्या भूमिकेला महत्त्व आहे. अलीकडील काही कार्यक्रमांमधून संजय घाटगे आणि संजय मंडलिक यांच्यामध्ये संभाषण होत आहे, तर दुसऱ्या बाजूला कागल व मुरगूड पालिका निवडणुकीत झालेली या तिघांची कागदोपत्री युती मुश्रीफांच्या खेळीपुढे वास्तवात उतरली नाही. पालिका निवडणुकीत संजय मंडलिक आणि मुश्रीफ यांच्यात राजकीय साटेलोटे असल्याची चर्चा होत असतानाच मुश्रीफांसोबत युती केलेल्या मंडलिक गटाचे चंद्रकांत गवळी यांचा एसडीएम फौंडेशनवर झालेला जाहीर सत्कार बरेच काही सांगून जातो. सध्या संजय घाटगे गटाकडे असणारे पंचायत समितीचे सभापतिपद मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे मागणे सुरू केल्याने घाटगे गट ते सोडणार का, हा चर्चेचा विषय आहे. मुश्रीफांना रोखण्यासाठी त्यात तडजोडही होऊ शकते. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा घेत समरजितसिंह घाटगे या युतीत सहभागी होतील, अशी चर्चा आहे. 

समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून पक्षीय राजकारणालाच त्यांनी महत्त्व दिले आहे. पक्षीय पातळीवर युती होईल त्यांच्यासोबत आपण राहू, असे जाहीरपणे वक्तव्य केले आहे.  

सदाशिवराव मंडलिक यांनी आमदार हसन मुश्रीफांसोबत अखेरची काही वर्षे टोकाचा संघर्ष केला. त्यांच्यापश्‍चात प्रा. मंडलिकांनी ठिकठिकाणी मुश्रीफांशी केलेली युती काही मंडलिकप्रेमींना रुचलेली नाही. एसडीएम फौंडेशवर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रा. मंडलिकांनी सत्तेच्या कुलपाची चावी आपल्याकडे आहे, असे वक्तव्य करत सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जागावाटपाचा तिढा कसा सुटणार, याचीही चर्चा होत आहे. या निवडणुकीत आमदार मुश्रीफांसोबत संजय घाटगे व समरजितसिंह घाटगे यांच्या युतीची शक्‍यता जवळपास अशक्‍यच आहे. गेली पस्तीस वर्षे पंचायत समितीच्या माध्यमातून सत्तेवर असलेल्या संजय घाटगे यांनी आपल्या मुरब्बी राजकारणाचा सल्ला देत समरजित घाटगे यांना युतीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. तसेच विविध विकासकामे आणि किटली वाटपाच्या माध्यमातून अंबरिश घाटगे गावोगावी बैठका घेत आहेत. मंडलिक गट संपर्क वाढवत आहे, तर मुश्रीफांनी आमदार निधीतून विकासकामांचा धडाका लावला आहे.  

अंबरिश, वीरेंद्र, नाविद रिंगणात
जिल्हा परिषदेचे पाचही मतदारसंघ खुले आहेत. यामध्ये नानीबाई चिखली व सेनापती कापशी हे मतदारसंघ सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले असून, सिद्धनेर्ली, बोरवडे व कसबा सांगाव हे मतदारसंघ सर्वसाधारण आहेत. बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून वीरेंद्र मंडलिक, सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघातून अंबरिश घाटगे, तर कसबा सांगाव मतदारसंघातून नाविद मुश्रीफ यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. मुश्रीफ गटास स्वतंत्र लढावयास लागले तर नावीद मुश्रीफ रिंगणात उतरणार का, याचीही चर्चा जनतेतून होत आहे. 
 

कानोसा...
जागावाटपाचा मुद्दा युतीसाठी महत्त्वाचा
तालुक्‍याच्या राजकारणात मुश्रीफांना एकटे पाडण्याचा प्रयत्न
संजय घाटगे व समरजित घाटगे यांची मुश्रीफांसोबत युतीची शक्‍यता कमी
पंचायत समिती पदाधिकारी कालावधीत बदलाची शक्‍यता 
मंडलिक गटाकडून जागावाटपामध्ये दबावतंत्राची शक्‍यता
तीन गट एकत्र आले तर मुश्रीफांची लागणार कसोटी

Web Title: Mushrif add to attain the ridge