नगरमध्ये तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Debt waiver to three and a half lakh farmers
Debt waiver to three and a half lakh farmers

नगर ः - गावांचा सर्वांगीण विकास करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. जिल्हा हा या विकासप्रक्रियेतील महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहे. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहन

प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोलीस परेड मैदानावर झाला. यानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्य शासन नागरिकांसाठी करीत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, पद्म पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि बीजमाता राहीबाई पोपेरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

शानदार संचलन
यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संचलनाची पाहणी केली. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि बीजमाता राहीबाई पोपेरे यांचा त्यांनी विशेष सत्कार केला. तालुकास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार, अहमदनगर पोलीस दलातील विशेष तपास, गुन्हे उघड अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले.

पवार, झहीर, राहीबाईंना पद्मश्री अभिमानाची बाब
यावेळी पालकमंत्री म्हणाले, अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण यासह विविध क्षेत्रात अग्रेसर असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या मदतीने निश्चित प्रयत्न करु. ग्रामविकासासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आणि हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, पारंपरिक बियाणांचे संकलन करणार्‍या  बीजमाता राहीबाई पोपेरे आणि श्रीरामपूर एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाणारे क्रिकेटपटू झहीर खान यांना भारत सरकारचा पद्मश्री सन्मान जाहीर झाला आहे. ही सर्व जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

तीन लाख शेतकऱ्यांना लाभ

शेती हाच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय राज्य शासनाने घेतला. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यातील 3 लाख 6 हजार 221 शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या तसेच नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांनाही शासन निश्चितपणे दिलासा देणार असल्याचे सांगून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकर्‍यांना स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठे यांच्या संशोधनाचा लाभ इतर शेतकर्‍यांपर्यंत  पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले. 

फिरते पशु चिकित्सालय लवकरच
पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि जोपासनेसाठी लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु केले जाणार आहे. पशुधनाची जोपासना महत्वाची असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. 

ऐतिहासिक स्थळांसाठी दीड कोटी
जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगून विकासकामांसाठी राज्यस्तरावरुन अधिकाधिक निधी मिळवण्याचा आपण निश्चित प्रयत्न करु, असे ते म्हणाले.

नुकसान भरपाईपोटी साडेतीनशे कोटी
कर्जमुक्ती योजनेबरोबरच आपण दहा रुपयांत सकस भोजन देणारी शिवभोजन योजना आजपासून जिल्ह्यासह राज्यभरात सुरु करण्यात आली आहे. गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे, हा या योजनेचा हेतू आहे. ग्रामविकासावर राज्य शासनाचा विशेष भर राहणार आहे. सध्या सुरु असलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत व्यापक सुधारणा करुन ग्रामविकासाला अधिक चालना देण्याच्या दृष्टीने कै. आर.आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना आपण राबविणार आहोत. अधिकाधिक गावांचा विकास प्रक्रियेत सहभाग वाढावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याच्या योजनेत आपल्या जिल्ह्याचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत करुन युवकांना कौशल्य आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कृषीपूरक योजनांच्या बाबतीत जिल्ह्याने अग्रस्थान कायम ठेवले आहे. शेतकर्‍यांना पाठबळ देण्याचे राज्य शासनाचे धोरण असून मागील वर्षी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून जिल्ह्यात आपण 348 कोटी 32 लाख रुपयांचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आपल्या जिल्ह्याने अधिक चांगले काम केले असल्याचे ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून परिसर स्वच्छतेला चालना मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्व गावे, नगरपालिका आणि महानगरपालिका परिसर स्वच्छ व सुंदर असावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शाळांचा सहभाग
भारतीय राज्यघटनेतील मूलतत्वांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता सर्व नागरिकांना समजावी, यासाठी सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे ते म्हणाले. यावेळी ध्वजारोहणानंतर श्री. मुश्रीफ यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. आजच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीभर गीत व नृत्य सादर केले तर श्री समर्थ विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी 'माझं नगरस्वच्छ होतंय' हे पथनाट्य सादर केले. जिल्हा पोलीस दलाच्या जलद प्रतिसाद दलाने कार चेसिंग डेमो यावेळी सादर केला. त्याचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास जिल्ह्यातील स्‍वातंत्र्यसैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबिय, लोकप्रतिनिधी, ज्‍येष्‍ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com