मटण आणि चिकन दरात झाली इतकी घसरण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

सांगली-  कोरोना "लॉकडाउन' च्या काळात सातशे रूपयापर्यंत गेलेला मटणाचा दर सध्या 550 रूपयापर्यंत उतरला आहे. तर चिकन दरात अडीचशे रूपयांवरून दोनशे रूपयांपर्यंत घसरण झाली आहे. अद्यापही काही विक्रेते मात्र जादा दरानेच विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. 

सांगली-  कोरोना "लॉकडाउन' च्या काळात सातशे रूपयापर्यंत गेलेला मटणाचा दर सध्या 550 रूपयापर्यंत उतरला आहे. तर चिकन दरात अडीचशे रूपयांवरून दोनशे रूपयांपर्यंत घसरण झाली आहे. अद्यापही काही विक्रेते मात्र जादा दरानेच विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. 

"लॉकडाउन' च्या काळात जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे मटण विक्रेत्यांना सहजपणे माल मिळणे अवघड बनले. अनेकांनी स्वत:च गावोगावी बकरे शोधून आणून मटण विक्री सुरू केली. त्यामुळे लॉकडाउनपूर्वी 560 रूपयांवर असलेला मटणाचा दर 650 ते 700 रूपयांपर्यंत पोहोचला. तसेच कोरोनामध्ये अफवामुळे चिकन विक्री व्यवसायावर संकट आले होते. शंभर रूपये किलोपासून ते अनेक पोल्ट्री व्यवसायिकांनी फुकट कोंबड्या वाटल्या. परंतू नंतर मटणाचा वाढलेला दर आणि अफवा दूर झाल्यामुळे चिकनला मागणी वाढली. परंतू पुरवठा कमी असल्यामुळे दर थेट 250 रूपयांवर पोहोचला. मटण आणि चिकन दराने उच्चांक गाठल्यामुळे खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली. तर या काळात मटण-चिकन विक्रेत्यांचा काही प्रमाणात नफा झाला. 

गेले काही दिवस मटण 650 रूपये आणि चिकन 250 रूपये दराने विकले जात आहे. परंतू सध्या जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे अन्य राज्यात जाणारा माल थांबला आहे. स्थानिक पातळीवर बोकडांची संख्याही वाढली आहे. तसेच हॉटेल व्यवसाय अद्यापही बंदच आहे. त्याचा परिणाम म्हणून मटण विक्रेत्यांना स्वस्तात माल मिळू लागला आहे. त्यामुळे चार-पाच दिवसापासून अनेक मटण विक्रेत्यांनी दरात 650 रूपयावरून 550 रूपयांपर्यंत कपात केली आहे. तोच प्रकार चिकनच्या बाबतीत आहे. 250 रूपयावरून चिकन दर 200 रूपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात जादा दरामुळे मांसाहार वर्ज्य केलेल्या सामान्य व मध्यमवर्गीयांना मांसाहाराची चव चाखता येऊ लागली आहे. 

मटण व चिकनच्या दरात अनेक विक्रेत्यांनी कपात केली असली तरी काहीजण अद्यापही जादा दराने विक्री करत आहेत. एकीकडे स्वस्त तर दुसरीकडे महाग यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्वस्त आणि महाग दराने विक्री करणारे ग्राहकांना आपला दर कसा योग्य आहे? हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutton and chicken prices fell so much