प्लॉटची मालकी असलेल्या महिलेच्या जागी दुसरीच महिला उभी करून परस्पर विक्री..शामरावनगरमधील प्रकार

घनशाम नवाथे
Friday, 17 July 2020

सांगली- प्लॉटची मालकी असलेल्या महिलेच्या जागी दुसरीच महिला उभी करून दुय्यम निबंधक कार्यालयातून परस्पर प्लॉटची खरेदी व विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुपवाडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कडेगाव येथील सुभाष युवराज मोहिते आणि अनोळखी महिलेविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश उत्तम चव्हाण (वय 38, रा. हरिपूर रस्ता, काळीवाट, गणेश पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. 

सांगली- प्लॉटची मालकी असलेल्या महिलेच्या जागी दुसरीच महिला उभी करून दुय्यम निबंधक कार्यालयातून परस्पर प्लॉटची खरेदी व विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कुपवाडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कडेगाव येथील सुभाष युवराज मोहिते आणि अनोळखी महिलेविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश उत्तम चव्हाण (वय 38, रा. हरिपूर रस्ता, काळीवाट, गणेश पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी राजेश चव्हाण यांच्या आई मंगल उत्तम चव्हाण यांनी 1998 मध्ये शामरावनगर येथील एपीजे अब्दुल कलाम कॉलेजच्या मागे साडेचार गुंठे प्लॉट खरेदी केला आहे. त्यांच्या नावावरच प्लॉटची मालकी आहे. 2017 मध्ये संशयित सुभाष मोहिते याने मंगल चव्हाण या नावाने दुसऱ्याच कोणत्या तरी महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून प्लॉट स्वत:च्या नावाने खरेदी करून घेतला. त्यानंतर मोहिते याने हा प्लॉट विक्री करण्यासाठी इतरांना विचारणा सुरू केली. तेव्हा योगायोगाने फिर्यादी चव्हाण यांना त्यांचाच प्लॉट कोणीतरी खरेदी करून तो विकत असल्याचे समजल्यामुळे धक्का बसला. त्यांनी तातडीने चौकशी केली तेव्हा प्लॉटची परस्पर विक्री करण्यात आल्याची माहिती मिळाली. 

श्री. चव्हाण यांनी संशयित मोहिते याला गाठून विचारणा केल्यानंतर सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर प्लॉट पुन्हा नावावर करतो असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात मोहिते स्वत:च्या नावावर खरेदी केलेला सदरचा प्लॉट पुन्हा एकदा मंगल चव्हाण नावाने अनोळखी महिला उभी करून तिच्या नावावर केला. 
मंगल चव्हाण या नावाने दुसरीच अनोळखी महिला उभी करून एकदा नव्हे तर दोनवेळा कुपवाड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून मोहिते याने प्लॉटची खरेदी व विक्री केली. त्यामुळे चव्हाण यांनी सांगली शहर पोलिस ठाणे गाठून मोहिते व अनोळखी महिलेविरुद्ध फिर्याद दिली. शासनाची व प्लॉट मालकाची फसवणूक करून बनावट दस्तऐवज बनवल्याबद्दल मोहिते व अनोळखी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शामरावनगरमध्ये दुसऱ्यांदा प्रकार- 
शामरावनगर येथील एकाच्या मालकीचा प्लॉट बनावट व्यक्ती उभ्या करून परस्पर विक्री केल्याचा प्रकार पाच वर्षापूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणातील संशयित सध्या जामिनावर मुक्त आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा शामरावनगरमधील प्लॉट बनावट मालक उभा करून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mutual sale by erecting another woman in place of the woman who owns the plot. Types in Shamravnagar