नाना पाटेकर म्हणाले... मानवतेविरुद्धच्या साऱ्या भिंती तोडा....

nana patekar speech in belgaum marathi news
nana patekar speech in belgaum marathi news

बेळगाव - आपण आपल्याभोवती एवढ्या भिंती बांधून ठेवल्या आहेत की पलीकडचे काहीच दिसत नाही. आभाळ, निसर्ग, प्राणी-पक्षी, माती असे सारेच आपण विसरत आहोत. या घुसमटीत आपली संवेदनशीलता हरवते आहे, शेजारधर्म हरवतो आहे व आपण मुके होत आहोत. हे चित्र बदलायचे असेल तर मानवतेविरुद्धच्या साऱ्या भिंती तोडायला हव्यात, असे मत प्रसिध्द अभिनेते आणि रंगकर्मी नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी महोत्सवाला मंगळवारी (ता. ४) प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्‌घाटन करुन ते बोलत होते. बाबा धोंड अध्यक्षस्थानी होते. उद्योजक दिलीप चिटणीस, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, दत्ता पाडेकर व प्रभा कुलकर्णी व्यासपीठावर होते.

कलेची मशाल पेटती ठेवणे महत्वाचे

ते पुढे म्हणाले, मनातली घुसमट, मनाची भूक, अवहेलना या सगळ्यांचे प्रकटीकरण म्हणजे सर्व कला. आपल्या अवतीभवतीची, समाजातली विसंगती टिपण्याचा प्रयत्न कलाकार करीत असतो. त्याला काहीतरी मांडायचे असते. व्यक्त व्हायचे असते. त्यामधूनच कलाकृती उदयाला येतात. अस्सल असलेले कधी जुने होत नाही. यासाठी तुमचे चित्र, तुमचे गाणे, अभिनय, कला पारदर्शी हवी. कलेची मशाल पेटती ठेवणे महत्वाचे आहे, असा सल्ला त्यांनी दिला.

जगभरात क्रांतीची सुरवात स्टेजवरुनच झालेली आहे. प्रत्येकाची क्रांती वेगळी असते. जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आज आपण  सगळ्या सुविधांचे गुलाम होत आहोत. प्रत्येक गोष्टीचे व्यापारीकरण होते आहे. शहरातल्या गलिच्छ वासापेक्षा शेणाचा वास कधीही बरा. आजची राजकीय, सामाजिक परिस्थिती आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, असे पाटेकर यांनी सांगितले. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील आपले काही दाहक अनुभव मांडत आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, असा उल्लेखही त्यांनी केला. प्रारंभी जगदीश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दीपप्रज्वलन करुन नाना पाटेकर यांनी महोत्सवाचे उद्‌घाटन केले. प्रा. अनिल चौधरी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

घरांसह मनालाही कड्या

आज शेजार धर्म हरवला असून, कड्या आपण फक्त दरवाजांना घातल्या नाहीत तर मनालाही कड्या घातल्या आहेत. आपण मनाला मारायला लागलोय. पूर्वीच्या काळी चालणाऱ्या सहज गप्पा आता बंद झाल्या आहेत. एक घास आपण खावा. दुसरा घास दुसऱ्याला द्यावा ही देण्याची वृत्ती व जाणीव महत्त्वाची असते, असे नाना पाटेकर म्हणाले. के.बीं.चा उल्लेख करून गुरुंचे ज्ञान शिष्यांमध्ये झिरपत जाते, असे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com