nana patole on sangli district tour and press conference assembly chairperson
nana patole on sangli district tour and press conference assembly chairperson

विधानसभा अध्यक्ष कॉंग्रेसचाच असेल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर नेत्याचा दावा

सांगली : राज्याचे विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडेच आहे. त्याबाबत आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महिनाभरात कोरोनाची स्थिती पाहून राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवड केली जाईल, अशी अपेक्षा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष पाटोले आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी कॉंग्रेसच्या प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, 'विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आमदारांच्या मतावर होते. आताच्या अधिवेशन काळात कोरोनाने अनेक मंत्री, आमदार बाधित झाले होते. शिवाय, अधिवेशन सुरु असतानाही अनेकजण बाधित झाले. त्यामुळे निवड घेणे अडचणीची होते. विधानसभेचे हे शंभरावे वर्ष आहे. त्याच्या अध्यक्षपदाला तितकेच महत्व आहे. अधिवेशनाच्या काळातच अध्यक्षपद व्हावे, अशी अपेक्षा होती, पण आमदार गैरहजर असल्याने अडचण झाली. महाविकास आघाडीकडे 171 आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे मतदानाला घाबरण्याचे कारण नाही.'

पुढे ते म्हणाले, 'शरद पवार यांनी अध्यक्षपदाबाबत केलेले एक वक्तव्य पुन्हा दुरुस्त केले आहे. त्यामुळे काही अडचण नाही. कॉंग्रेसचाच अध्यक्ष होणार यात शंका नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो आहोत. मार्च किंवा एप्रिलमध्ये विशेष अधिवेशन घेऊन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडून द्यायची ही राज्याची परंपरा राहिली आहे. विरोधी पक्ष ही परंपरा मोडणार असेल तर तो त्यांचा विषय आहे.'

महाराष्ट्र हे कॉंग्रेस विचारांचे राज्य आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसची परंपरा आहे. आम्हाला संघटनात्मक रचना मजबूत करायची आहे. राज्याच्या विकासाची दिशा पुढे नेण्याचा संकल्प आम्ही करू. राज्यातील स्थिती पाहिली तर बेरोजगारी आहे, शेतीची अवस्था बिकट आहे. केंद्र सरकार राज्याला मदत करत नाही. या गोष्टींतून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा संकल्प करेल आणि कॉंग्रेस एक नंबरचा पक्ष होईल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com