कोरोना बाधित युवकामुळे नांद्रे गाव तीन दिवस 'लॉक'

बाळासाहेब गणे 
Monday, 20 July 2020

नांद्रे (ता. मिरज) येथे सापडलेल्या 31 वर्षीय कोरोना बाधित एका युवकाचा अहवाल पाझिटिव्ह आल्याने संबंधित रुग्णचे घर व तेथील परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.

तुंग : नांद्रे (ता. मिरज) येथे सापडलेल्या 31 वर्षीय कोरोना बाधित एका युवकाचा अहवाल पाझिटिव्ह आल्याने संबंधित रुग्णचे घर व तेथील परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. आरोग्य विभागामार्फत गावात तपासणीची मोहीम गतीने सुरू केली आहे. रुग्ण सापडल्याने मात्र गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

गाव प्रशासनाने तीन दिवस अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद घोषित करण्यात आले आहे. अत्यावश्‍यक सेवा व्यतिरिक्त कोणतीही सेवा सुरू राहणार नसल्याचे सरपंच दिपाली नांद्रेकर यांनी सांगितले. संबंधित रुग्णाचे घर व परिसर कंटेन्मेंट झोन करुन पत्रे मारुन परिसरात निर्जंतुक फवारणी केली आहे. गावात जंतुनाशक औषध फवारणी करुन तपासणी घेण्याचे काम सुरू केले आहे. 

सर्व ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करीत आहे लहान मुले व वयस्कर लोकांचे तपासणी वर भर दिला जात आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची यादी बनवून त्यांना उपचार देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आर पी गुरव, सुपरवायझर मिरजकर,आरोग्य सेवक वावरे, सारिका अब्दागिरे तसेच आशा वर्कस व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने गावात तपासणी सुरू आहे. 

नाद्रे येथे कुपवाडे गल्लीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यावर तातडीने मिरज पंचायत समितीचे सदस्य राहुल सकळे, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उद्योजक सुदर्शन हेरले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावीर पाटील, सरपंच दिपाली नांद्रेकर, उपसरपंच सुहास पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पाटील, मंडल अधिकारी सुभाष जाधव, गावमकामगार तलाठी महावीर सासने, ग्राम विकास अधिकारी उमेश नवाळे, पोलीस पाटील स्वाती वजाळे यांनी भेट देऊन परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सांगली

सांगली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nandre village 'locked' for three days