वायपुत्र पदवी बहाल करण्यात आलेले नारायण जगदाळे यांचे निधन 

सुदर्शन हांडे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

बार्शी - येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांचे पुतणे नारायण पंढरीनाथ जगदाळे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (ता.२०) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

बार्शी - येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांचे पुतणे नारायण पंढरीनाथ जगदाळे यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (ता.२०) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

ते मूळचे बार्शी तालुक्यातील चारे येथील होत. त्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालय, बार्शी व जय हिंद विद्यालय कसबे तडवळे या शाखांमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावली. शालेय जीवनापासून त्यांना धावण्याचा छंद होता. अनेक धावण्याच्या शैर्याती जिंकत त्यांनी विविध पारितोषिक मिळवली. १९७३ त्यांनी १५ तासात १२० किमी अंतर धावण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळेच त्यांना पुणे येथे वायपुत्र ही पदवी बहाल करण्यात आली होती. 

शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्या नंतर मेहर बाबांच्या प्रेरणेने २ ऑक्टोबर १९८९ गांधी जयंतीचे औचित्य साधून आजीवन मौनव्रत धारण करण्याचा निर्णय घेतला होता तो त्यांनी आजीवन पाळला. संवेदनशील असलेल्या वायपुत्रांनी आपले निवृत्ती वेतन विविध शाळा व सामाजिक संस्थांना दान म्हणून देता होते. संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांचे ते वडील होत. समाजाविषयीची अपार तळमळ त्यांच्या ठायी होती. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचा वैचारिक वारसा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अखंड निष्ठेने जोपासला. मामासाहेबांनंतर समाजाच्या प्रश्नांना कायम आपले मानून त्याच्या सोडवणूकीसाठी आत्मीय प्रयत्न करणार्‍या या मौनीबाबांचे निधन बार्शीकरांना अस्वस्थ करणारे आहे.

त्यांची अंत्ययात्रा बार्शीतील शिवाजी नगर येथील राहत्या घरापासून काढण्यात आली. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारातून अंत्ययात्रा मोक्षधाम आणत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी आमदार राजेंद्र राऊत, भाजप नेते राजेंद्र मिरगणे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी नगराध्यक्ष विश्वास बरबोले, योगेश सोपल, रमेश पाटील, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव , सचिव व्ही. एस. पाटील, सहसचिव पी. टी. पाटील, खजिनदार दिलीप रेवडकर, सदस्य जयकुमार शितोळे, अरुण देबाडवर, प्राचार्य व. न. इंगळे, प्राचार्य चंद्रकांत मोरे, प्राचार्य सोपान मोरे, कामगार नेते तानाजी ठोंबरे, प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात, प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांच्यासह संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. बुधवारी संत तुकाराम सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

Web Title: Narayan Jagdale passes away