esakal | सांगलीचा गौरव : अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला "राष्ट्रीय जल पुरस्कार' 
sakal

बोलून बातमी शोधा

National Water Award to Sangali for Agraani River Rehabilitation

सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे.

सांगलीचा गौरव : अग्रणी नदी पुनरुज्जीवन कार्याला "राष्ट्रीय जल पुरस्कार' 

sakal_logo
By
दीपक पवार

आटपाडी : सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे. पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयातर्फे जल क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी वर्ष 2019 चे राष्ट्रीय जल पुरस्कार घोषित झाले आहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरुज्जीवन श्रेणीत देशातील एकूण सहा विभागांत प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित करण्यात आले. पश्‍चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. पश्‍चिम विभागात चार राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 

सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्‍यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी 150 वर्षांपूर्वी वाहती होती. मात्र, मध्यंतरीच्या काही दशकांत ही नदी कोरडी पडली होती, तसेच नदीचे काही क्षेत्र लुप्तही झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणीसाठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्‍यांतील 55 किलोमीटर लांबीची ही अग्रणी नदी बारमाही वाहती करण्याचे कार्य ध्यासाने पूर्ण केले.

राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला पुनरुज्जीवन मिळाले. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले आहे. हे पात्र खानापूर तालुक्‍यात 22 किलोमीटर इतके आहे. उगमापासून तामखडी, जाधववाडी, गोरेवाडी, बेणापूर, बलवडी, करंजे, सुलतानगादे आदी गावांतील स्थानिकांनी या कार्यात सक्रिय श्रमदान दिले. त्यामुळे जवळपास दोन कोटी मूल्य असणारी ही कामे अवघ्या 65 लाख रुपयांमध्ये पूर्णत्वास आली.

या कामांतर्गत नदीपात्रातील तीन लाख 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे नदीचे पात्र 50 फूट रुंद व सहा फूट खोल करण्यात प्रशासनाला यश आले. या नदीपात्रात ठिकठिकाणी 50 ते 60 नालाबांध घालण्यात आले. त्यामुळे साठणाऱ्या पाण्याचा लाभ परिसरातील जनतेला झाला. अग्रणी नदी बारमाही झाल्याने नदीकाठच्या 21 गावांना लाभ झाला. तसेच, अग्रणी खोरे बारमाही होऊन या खोऱ्यातील 105 गावांत जलक्रांती घडून आली. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान : गायकवाड 
"राष्ट्रीय जल पुरस्कार' हा अग्रणी नदी खोऱ्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सन्मान असल्याच्या भावना सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्याचे विद्यमान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केल्या. नदीच्या एकूण 55 किलोमीटरच्या पुनरुज्जीवनाचे कार्य केवळ दीड वर्षात पूर्ण करण्यात आले. यासाठी नवीन 34 बंधारे बांधले. विशेष म्हणजे यात उगमापासून लुप्त झालेल्या 22 किलोमीटर नदीपात्राचे पुनरुज्जीवन करण्यात आले. 150 वर्षांनतर अग्रणी पुन्हा प्रवाहित झाली व सुमारे 28 हजार शेतकऱ्यांच्या जीवनात यामुळे आनंद निर्माण झाला. या कार्याची प्रेरणा घेऊन कर्नाटकातील तीन गावांनीही लोकवर्गणीतून हे कार्य पुढे चालविले आहे, ही बाबही त्यांनी या वेळी अधोरेखीत केली. 

संपादन : युवराज यादव

loading image