एकही नेता बरोबर नसताना पवारांनी दाखविली 'पॉवर'! 

अशोक मुरुमकर 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कार्यकर्ते म्हणतात... 
मेळावा झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या तेव्हा त्यांनी आम्ही पवार साहेंबांबरोबरच असल्याचे सांगत "गेले ते कावळे राहिले ते मावळे' म्हणत पक्षांतर करणाऱ्याना फटकारले. माढा तालुक्‍यातील उंदरगाव येथील महादेव मस्के म्हणाले, कोणी काहीही करुद्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणून येतील.

सोलापूर : विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यानंतरही कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर असल्याचे चित्र सोलापूरात मंगळवारी (ता. 17) दिसले. वेगवेगळी कारणं सागत पक्ष संकटात असताना करमाळ्यातील बागल, बार्शीचे सोपल, माळशिरसचे मोहिते पाटील, माढ्याचे शिंदे, सांगोल्याचे साळुंके यांनी पक्षांतरे (यातील काही भाजप व शिवसेनेच्या वाटेवर आहेत) केली. मात्र, त्यांच्याबरोबर सामान्य कार्यकर्ता गेला नाही, हे गर्दीवरुन जाणवते. बड्या नेत्यांच्या शिवसेना व भाजप प्रवेशामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक जिल्ह्यात वाटते तेवढी सोपी होणार नाही, असाच अंदाज यावरुन येऊ लागला आहे. नेहमीचे नेते नसतानासुद्धा शरद पवारांच्या सभेला झालेल्या गर्दीने विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

लोकसभा निवडणूकीत पराभव झाल्यानंतर शरद पवार सोलापूरात मंगळवारी पहिल्यांदा आले होते. विधानसभेच्या तोंडावर पक्षांतरे झाल्याने राज्यभर निघालेली "शिवस्वराज्य' यात्रा करमाळा आणि माढा येथे घेता आली नसल्याने राष्ट्रवादीला नामुष्की पत्करावी लागली होती. त्यामुळे कार्यकर्तेही हवालदील झाले होते. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीला उमेदवारही मिळणार नाही असे वातावरण आहे. त्यात पवार यांनी कार्यकर्तांचा मेळावा घेऊन विश्‍वास देण्याचे काम केले आहे. या मेळाव्यात गर्दीमुळे सभागृहात कार्यकर्त्यांना जागा मिळाली नाही. त्यामुळे बाहेर थांबावे लागले. 
मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी "सोलापूर आणि शरद पवार' यांचे असलेले नाते सांगून शेतकरी, कामगार, तरुण व वयोवृद कार्यकर्त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी किल्लारी येथे झालेल्या भुकंपावेळी राज्याचा प्रमुख म्हणून केलेली मदत व भाजप सरकारने कोल्हापूर, सांगली येथील पुरावेळी केलेली मदत याचे दाखले देत. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक आठवणी सांगीतल्या. या मेळाव्यातील गर्दीचा राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी कितपत उपयोग होईल, हे आता सांगता येणार नाही. मात्र कार्यकर्त्यांचा यातून उत्साह वाढला हे नक्की! 

कार्यकर्ते म्हणतात... 
मेळावा झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या तेव्हा त्यांनी आम्ही पवार साहेंबांबरोबरच असल्याचे सांगत "गेले ते कावळे राहिले ते मावळे' म्हणत पक्षांतर करणाऱ्याना फटकारले. माढा तालुक्‍यातील उंदरगाव येथील महादेव मस्के म्हणाले, कोणी काहीही करुद्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणून येतील. नेते गेले म्हणजे, कार्यकर्ते गेलेले नाही. केवळ पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा वर्ग मोठा आहे. सरकोली येथील प्रविण भोसले म्हणाले, राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादीला पुन्हा चांगले दिवस येतील. राष्ट्रवादी हा तळागळापर्यंत पोचलेला पक्ष आहे.

पंढरपूर तालुक्‍यातील भोसले येथील अमरसिंह भोसले म्हणाले, किती नेते गेले तरी शरद पवार यांच्याबरोबर कार्यकर्ते आहेत. हे या मेळाव्यावरुन दिसते. कार्यकर्त्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. शेख म्हणाल्या, कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो. पहिली फळी पक्षाला सोडून गेली असली तरी दुसऱ्या फळतले कार्यकर्ते तयार होत आहेत. राष्ट्रवादी संपवायला सर्वजण बसले आहेत. मात्र, हा पक्ष कार्यकर्त्यांच्या मनात घर करुन राहिलेला आहे. जर नेत्यांबरोबर कार्यकर्ते गेले असते तर आजची गर्दी दिसली नसती. मोहोळ तालुक्‍यातील अनगर येथून आलेले समाधान सरग म्हणाले, सध्याचे वातावरण पाहता आजच्या मेळाव्याला गर्दी होईल की, नाही अशी शक्‍यता होती. पण या शक्‍यता सर्व विरल्या आहेत. विरोधकांना नक्कीच धडकी भरवल्याशीवय राहणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar campaign in Solapur