साताऱ्यातील सभेत भिजूनही पवार 'हे' नाहीत विसरले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा काल रात्री साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाली. त्या आधी पाटण तालुक्‍यातील मल्हारपेठ येथे खासदार शरद पवार यांची सभा होती. ही सभा संपवून साताऱ्यात येण्यासाठी पवार यांना थोडा उशीरच झाला.

सातारा : शरद पवारांची साताऱ्यातील 18 ऑक्टोबरची सभा ऐतिहासिक अशी ठरली. धो धो पावसात चिंब भिजत हजारोंच्या संख्येने उपस्थित राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या जनतेला काल शरद पवारांनी संबोधित केल्यानंतर ते थेट हॉटेल प्रितीमध्ये गेले. तेथे त्यांनी सर्व आवरून पुन्हा काही निवडक नेत्यांशी चर्चा केली. रात्री अकरा वाजता त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर जेवण केले. शनिवारी सकाळी आठ वाजता ते कर्जत (जामखेड) कडे प्रचारसभेसाठी रवाना झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा काल रात्री साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झाली. त्या आधी पाटण तालुक्‍यातील मल्हारपेठ येथे खासदार शरद पवार यांची सभा होती. ही सभा संपवून साताऱ्यात येण्यासाठी पवार यांना थोडा उशीरच झाला. पण सायंकाळी पाच वाजल्यापासून पवारांची वाट पहात जिल्हा परिषदेच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व समर्थक थांबले होते.

साताऱ्यातील सभा सुरू व्हायला आणि पाऊस यायला एकच वेळ झाली. पवारांचे सभेच्या ठिकाणी आगमन झाले आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत राष्ट्रवादीच्या गाण्यावर ताल धरला. वरून पडणारा पाऊस आणि मैदानात बसलेले कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून शरद पवार ही भारावून गेले. पावसामुळे आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली भाषणे थोडक्‍यात उरकली. तोपर्यंत पावसाने जोरात सुरवात केली.

त्यानंतर पवार यांचे भाषण सुरू झाले. पावसातच पवार यांनी भाषण करून उपस्थितांना इतिहास घडविण्याचा सल्ला दिला. सभा संपल्यावर चिंब भिजलेल्या अवस्थेत हॉटेल प्रिती मध्ये आले. तेथे त्यांनी सर्व आवरून पुन्हा तयार झाले. त्यांनी जेवण घेतले, तोपर्यंत अकरा वाजले होते. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचा शनिवारी (ता. 19) वाढदिवस असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी रात्री अकरा वाजता आमदार शिंदेंचा वाढदिवस साजरा केला. पवारांच्या उपस्थित केक कापण्यात आला.  रात्री भिजत सभा ऐकलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी झोपेत होते. पण श्री. पवार मात्र, लवकर उठून प्रचारासाठी रवानाही झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar celebrate Shashikant Shinde birthday in Satara