साताऱ्यात उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून यांच्यासाठीच हट्ट

NCP
NCP

सातारा : लोकसभेसाठी राष्ट्रवादीने सक्षम उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरूच ठेवली आहे. श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सारंग पाटील, सुनील माने या इच्छुकांची नावे पुढे असली, तरी श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण हे दोनच उमेदवार उदयनराजेंच्या विरोधात चुरशीची लढत देऊ शकतात. राष्ट्रवादीकडे इच्छुक उमेदवार अनेक असले तरी केवळ पारदर्शक चेहरा, केंद्रातील अनुभव म्हणून पृथ्वीराज चव्हाणांसाठी राष्ट्रवादीने हट्ट धरला आहे; पण बलस्थाने पाहता श्रीनिवास पाटील हेच सर्वसमावेशक उमेदवार ठरणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर श्रीनिवास पाटील हे कऱ्हाड लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत, तसेच त्यांनी सिक्किमचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे. पूर्वीच्या कऱ्हाड मतदारसंघात जिल्ह्यातील कऱ्हाड, पाटण, वाळवा, शिराळा, जावळी, महाबळेश्‍वर हे तालुके येत होते. पुनर्रचनेनंतर सातारा आणि माढा असे मतदारसंघ झाले. आताच्या सातारा लोकसभा मतदारसंघात कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, पाटण, कोरेगाव, सातारा, वाई या विधानसभा मतदारसंघांसह जावळी, महाबळेश्‍वरचाही सहभाग होता. त्यामुळे आजही या ठिकाणाहून श्रीनिवास पाटील यांना मानणारा गट कार्यरत आहे, तसेच मागील वेळी उदयनराजेंबाबत कऱ्हाड व पाटण तालुक्‍यांत नाराजी होती. हे ओळखून त्यांनी मागील निवडणुकीत कऱ्हाड व पाटणवर लक्ष केंद्रित केले होते. कऱ्हाडातून आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला होता.

आजही कऱ्हाड, पाटणमधील उदयनराजेंविषयीचे वातावरण निवळलेले नाही. केवळ पाच महिन्यांत पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना उदयनराजेंना सर्वपातळीवर झुंजावे लागणार आहे. पक्षाने आपली सर्व ताकद उदयनराजेंच्या पाठीशी लावली, तरीही उदयनराजेंनी पक्ष सोडून भाजपमध्ये गेले, याचा राग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत विधानसभेसोबत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तटस्थ राहून काम करतील. त्यामुळे श्रीनिवास पाटील हे त्यांच्याविरोधात असतील तर निवडणूक सोपी राहणार नाही. श्रीनिवास पाटील यांच्याकडे दोनदा खासदारकी आणि सिक्‍किमच्या राज्यपालपदाच्या काळात लोकांसाठी दिलेले योगदान, तसेच निष्कलंक चेहरा, दमदार वक्‍तृत्वशैली या जमेच्या बाजू आहेत. त्यासोबतच त्यांचे या भागातील राजकारणातही नातेसंबंध आहेत. याचा त्यांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे कऱ्हाड, पाटण, जावळी, महाबळेश्‍वर व वाई तालुक्‍यांत त्यांना चांगली मते मिळू शकतील. सातारा, कोरेगाव तालुका निम्मा निम्मा चालल्यास त्यांना सोपे जाणार आहे; पण जमेच्या बाजूसोबत काही कमतरताही आहेत. त्यांचे वय जास्त झाल्याने ते लोकसभेच्या प्रचारात उदयनराजेंशी टक्कर देऊ शकणार नाहीत, तसेच मागील काही वर्षांत त्यांचा मतदारसंघाशी संपर्क कमी झालेला आहे. कऱ्हाड, पाटण वगळता इतरत्र त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जीवावर मतांची बेरीज करावी लागेल. 

उदयनराजेंविरोधात आघाडीचा उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे रिंगणात असल्यास त्यांना कॉंग्रेस व राष्ट्रवादीची मते मिळतील, असा विश्‍वास राष्ट्रवादीच्या नेत्यांत आहे. पारदर्शक, आश्‍वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या घराण्याला मोठा राजकीय वारसा आहे. गांधी घराण्याची जवळीक आणि केंद्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे लोकसभेत त्यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व गरजेचे आहे, यातूनच त्यांचे नाव लोकसभेसाठी राष्ट्रवादीने पुढे केले आहे. कऱ्हाड व पाटण हे दोन मतदारसंघ त्यांचा घरचा असल्यासारखे आहे. त्यामुळे तेथून त्यांना चांगले मतदान मिळू शकते, तसेच कोरेगाव, सातारा, वाईतूनही आघाडीची चांगली मते त्यांना मिळतील. त्यामुळे सर्वसमावेश चेहरा म्हणून त्यांना यावेळेस निवडणुकीत उतरविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहे. 

श्रीनिवास पाटील : 
* खासदारकीचा अनुभव 
* राज्यपालपदाचा अनुभव 
* सनदी अधिकारी ते राजकीय नेतेपदाचा अनुभव 
* निष्कलंक चेहरा, दमदार वक्‍तृत्व 
* जिल्ह्यात नातेसंबंधाचा फायदा 

पृथ्वीराज चव्हाण : 
* केंद्रातील कामाचा अनुभव 
* पारदर्शक, आश्‍वासक चेहरा 
* गांधी घराण्याशी जवळीक 
* लोकसभेत अभ्यासू नेतृत्व गरजेचे 
* सर्वसमावेशक चेहरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com