राष्ट्रवादीकडून शिवसेनेला 'येथे' अजून प्रस्तावच नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड दोन जानेवारी रोजी होणार आहे. या सत्ता समीकरणात शिवसेना ज्यांच्यासोबत जाईल, त्याला सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे.

सांगली - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड अवघ्या सहा दिवसांवर आलेली असताना राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाने शिवसेनेला अद्याप सत्तेसोबत येण्याबाबत प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने आपली कुठलीही भूमिका जाहीर केलेली नसल्याचे शिवसेना नेते आमदार अनिल बाबर यांनी ‘सकाळ’ची बोलताना स्पष्ट केले.

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड दोन जानेवारी रोजी होणार आहे. या सत्ता समीकरणात शिवसेना ज्यांच्यासोबत जाईल, त्याला सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे. सध्या भाजपची सत्ता अजून शिवसेनेने भाजपला सोबत केलेले आहे, मात्र राज्यातील नव्या सत्ता समीकरणामुळे शिवसेना कुणासोबत जाणार, हा प्रश्‍न कायम आहे. 

अद्याप आमची भूमिका अस्पष्ट

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास जिल्हा परिषदेत सत्ता बदल होणे शक्‍य आहे, मात्र त्यादृष्टीने राष्ट्रवादीने अद्याप कोणतीही पावले उचलली नसल्याचे समोर येत आहे. आमदार अनिल बाबर म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने माझ्याशी जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरण याबाबत चर्चा केलेली नाही. आमची कुठलीही भूमिका अद्याप ठरलेली नाही.’’

गटाला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्‍यता

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी, आपण जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणांमध्ये अजूनही लक्ष घातलेले नाही, असे ‘सकाळ’शी मोबाईल संदेशाद्वारे बोलताना सांगितले.  या घडामोडीत सांगलीत शिवसेनेच्या बाबर गटाची मोठी कोंडी झाली आहे. भाजपसोबत जाण्याचा त्यांचा विचार नसला तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्तेबाबतच्या हालचाली न केल्यामुळे या गटाला सत्तेपासून दूर राहावे लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Has Not Yet Received Proposal To Shiv Sena Sangli Marathi News